
पुणे: मालिश करण्याच्या बहाण्याने 59 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्याच्या प्रयत्न करत असताना झालेल्या विरोधानंतर महिलेच्या
पुणे: मालिश करण्याच्या बहाण्याने 59 वर्षीय महिलेवर अत्याचार करण्याच्या प्रयत्न करत असताना झालेल्या विरोधानंतर महिलेच्या गळ्यावर चाकूने वार करून अत्याचार करून तिच्या अंगावरील सोने लुटणार्यास न्यायालयाने जन्मठेपेसह तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. राजेश यादव (रा. वाकडेवाडी. मुळगाव उत्तर प्रदेश) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. सत्र न्यायाधीश डि. पी. रागीट यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या घटनेत पिडीतेचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना 18 फेब्रुवारी 2015 रोजी शिवाजीनगर येथील अनुतेज अथर्व सोसायटीत घडली होती. पिडीता ही घरात एकटीच राहत होती. त्याचा फायदा घेत यादव याने तिच्याशी ओळख वाढविली. घटनेच्या दिवशी पिडीतेला मदत करण्याच्या बहाण्याने तिच्या घरी जात मालिश करण्यास सुरवात केली यावेळी, त्याने पिडीतेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यास पिडीतेने विरोध केला असता त्याने रागाच्या भरात तिचे तोंड दाबून घरातील खाटाजवळ पडलेल्या भाजी कापायच्या छोट्या सुरीने तिच्या गळ्यावर वार केले. यामध्ये पिडीता गंभीर जखमी झाली असताना त्याने तिच्यावर अत्याचार केले. यादरम्यान, पिडीतेचा मृत्यू झाला.
अत्याचारनंतर पळून जात असताना त्याने पिडीतेच्या कानातील सोन्याचे टॉप्स, पायातील चांदीचे पैंजण, मोबाईल तसेच तीन हजार रोख घेऊन पसार झाला. शेजार्यांनी दार उघडले असल्याने घरात पाहिले असता पिडीता मृत अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.याप्रकरणी, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास करत आरोपीला अटक करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणात सरकार पक्षातर्फे अॅड. लीना पाठक यांनी काम पाहिले. त्यांनी 16 साक्षीदार तपासले. युक्तिवादादरम्यान वैद्यकीय अहवाल, आरोपीच्या बोटांचे ठसे हा पुरावा महत्त्वाचा ठरला.
आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी अॅड. पाठक यांनी केली. न्यायालायने ती मान्य करत आरोपीला जन्मठेपेसह तीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त सहा महिन्यांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.
Pune Crime: चाकूने वार करत 59 वर्षीय महिलेवर अत्याचार; आरोपीस जन्मठेप
महिलेशी ओळख वाढवित मालिश करण्याच्या बहाण्याने आरोपीचे कृत्य