अधिकारीपदी निवड झाली, पण २२ जणांना पत्रच नाही...
मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन समाजकल्याण अधिकारी, गट-ब या पदासाठी निवड झालेल्या २२ उमेदवारांना अद्यापही शासनाकडून नियुक्तिपत्र मिळालेले नाही. फेब्रुवारी २०२५ मध्ये निकाल जाहीर होऊनही ५ महिन्यांपासून या उमेदवारांना नियुक्तीसाठी ताटकळत ठेवले आहे.महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातील समाजकल्याण अधिकारी, गट-ब संवर्गातील २२ पदांसाठी १० मे २०२३ रोजी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. या परीक्षेची लेखी परीक्षा १८ ऑगस्ट २०२४ रोजी घेण्यात आली, तर मुलाखती फेब्रुवारी २०२५ मध्ये पार पडल्या.परीक्षेचा अंतिम निकाल ७ फेब्रुवारी २०२५ रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर निवड झालेल्या २२ उमेदवारांची शिफारस पत्र १७ मार्च २०२५ रोजी प्राप्त होऊन मंत्रालयात ७ एप्रिल २०२५ रोजी कागदपत्र पडताळणीही पूर्ण झाली आहे.