logo

गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप



शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा उपक्रम

प्रेरणापुंज/यवतमाळ :- यवतमाळच्या गोधणी रोडवरील जिल्हा परिषद गव्हनर्मेंट शाळेतील नवव्या वर्गाच्या गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम शाळेतील माजी विद्यार्थ्यांकडून राबविण्यात आला. विशेष म्हणजे शाळेच्या सन १९७४ व ७५ च्या हायर मॅट्रीक बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून यापुर्वीही अनेक उपक्रमाअंतर्गत गरीब होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यात आलेला आहे.

या कार्यक्रमाला यवतमाळ पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, माजी नगरसेविका तसेच शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संगीता कासार, माजी विद्यार्थी अरुण सरागे, अनिल अंबाडकर, अभय निसाळ, शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार, शाळेचे शिक्षक सुनिल गावंडे, संदीप मारगाये, प्रकाश साबळे, अहमद असलम, सुनिल बरमदे, शालीनी ठाकरे, सिमा सिडाम आदि शिक्षक उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक साहेबराव पवार यांनी प्रास्ताविकातून शाळेचे माजी विद्यार्थी शाळेला व विद्यार्थ्यांना करीत असलेल्या मदतीबद्दल माहिती दिली तसेच त्यांनी केलेल्या मदतीबाबत कृतज्ञता व्यक्त केली. माजी विद्यार्थी अरुण सरागे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना विद्यार्थी दशेतील गतकाळातील आठवणींना उजाळा दिला. शिका, मोठे व्हा, आपल्या शाळेचे, राज्याचे व देशाचे नाव उज्वल करा असा संदेश विद्यार्थ्यांना दिला. ज्या शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक विद्यार्थ्यांच्या उन्नती करीता शिकविण्याच्या कार्या सोबतच माजी विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून मिळेल ती मदत स्वीकारण्यास जीवाचा आटापिटा करतात, त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे भविष्य निश्चितच उज्वल आहे अशी भावना व्यक्त केली. गटशिक्षणाधिकारी भोयर यांनी आपले विचार मांडतांना समाजसेवेचे भान ठेवून माजी विद्यार्थी शाळेला व शाळेतील विद्यार्थ्यांना करीत असलेल्या मदतीबद्दल समाधान व्यक्त केले. या मदतीचा स्वीकार करून त्याचा उपयोग अभ्यासासाठी करा, चांगले करीअर घडवा, मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्यासाठी मेहनत घ्या, चांगले प्रशासक बना असा मोलाचा सल्ला दिला. याप्रसंगी इयत्ता नववीतील गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांचे हस्ते पुस्तके वितरित करण्यात आली. विनामूल्य पुस्तके मिळाल्याचा आनंद गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या चेह-यावर स्पष्ट जाणवत होता. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रकाश साबळे यांनी केले.

मान्यवरांचे हस्ते वृक्षारोपण

या कार्यक्रम प्रसंगी शाळेच्या परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुध्दा घेण्यात आला. सन 1975 च्या बॅचचे डॉ. विनोद डेहनकर यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणाचे महत्व पटवून देत त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले.

19
409 views