सावरगाव तेली परिसरात रेती माफियांचा हौदोस
किनगाव जटु ता.लोणार - येथील परिसरातील सावरगाव तेली परिसरातील पुर्णा नदीच्या पात्रात वाळूमाफियांनी ठिकठिकाणी पोखरून बेकायदा वाळु उपसा सुरु केला आहे. तसेच भूमराळा, खापरखेड व किनगाव जटु या परिसरातही ठिकठिकाणी अवैध रेती साठे असल्याचे चित्र आहे. लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैधरित्या होत असलेल्या या वाळुउपशाकडे महसूल प्रशासनासह पोलिस प्रशासनाचेही दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. शासनाकडून वाळू उपसावर बंदी असतानाही नियमांची पायमल्ली करुन बेकायदेशीर बांधकामांना या वाळूचा चोरुन वापर होत आहे. हा अवैध रेती उपसा व त्याची वाहतूक रात्री होत असल्याने शासनाचा महसूल बुडत असुन ही भूसंपत्ती थांबवण्याची गरज निर्माण झालेली आहे. वाळूमाफियांवर फसवी कारवाई होत असल्याने संबंधीतांशी साटेलोटे करुन कारवाईच्या जाचातुन सुटका करण्यात वाळूमाफियांना यश आले आहे. सावरगाव तेली येथील परिसरात मोठ्या प्रमाणात दिवसरात्र वाळू तस्करी होत आहे. या वाळूमाफियांवर आळा घालण्यासाठी महसूल प्रशासनाला अद्यापही यश का मिळाले नाही असा प्रश्न नक्कीच पडल्याशिवाय राहत नाही. राज्यांचे महसूल मंत्री यांनी याकडे लक्ष घालण्याची मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे.