logo

*चोंडीमध्ये पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी*

प्रतिनिधी ३१ मे (अहिल्यानगर ) - पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती अहिल्यानगर मधील चोंडी येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे, अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमदार सुरेश धस, आमदार शिवाजी कर्डिले, प्रा. लक्ष्मण हाके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पूर्ण महाराष्ट्रामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे भक्त हजारोंच्या संख्येने जयंतीसाठी चोंडीमध्ये दाखल झाले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच सभापतींनी उपस्थित असलेल्या भक्तांना संबोधित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी मध्य प्रदेश सरकारने आयोजित केलेल्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी गेले आहेत आणि राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु हवामानामुळे आणि काही अडचणीमुळे येऊ शकले नाहीत परंतु लवकरच देशाचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दर्शनासाठी चोंडी मध्ये येतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मंदिर, वाडा आणि शिल्पसृष्टी यांना आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. तसेच जयंतीनिमित्त अनेक कार्यक्रम राबविण्यात आले होते. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

40
2626 views