
क्रियाशील प्रेस क्लबच्या प्रमुख उपस्थितीत रनथॉन सायकलिंग ग्रुप "फिट इंडिया" प्रमाणपत्राने सन्मानित
पनवेल / प्रतिनिधी
नोव्हेंबर २०१४ मध्ये रनथॉन सायकलींग ग्रुप नवीन पनवेलचे संस्थापक पुरणसिंग मेहरा यांनी फिटनेससाठी सायकलिंग आणि समाजसेवा अशी अनोखी सांगड घालत ग्रुपची स्थापना केली आहे. आजमितीला तब्बल ३५० सदस्य या संस्थेमध्ये सक्रिय झाले आहेत. सायकलिंग सोबतच अपघातग्रस्तांना मदत मिळवून देणे, रक्तदान करणे, जखमी व्यक्तींना इस्पितळात तातडीने हलवणे, शिक्षणासाठी मदत करणे अशा समाजसेवेसाठी हा ग्रुप ओळखला जातो. रविवार दिनांक २५ मे रोजी नवीन पनवेल येथे हा अनोखा उपक्रम पार पडला. यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे उपाध्यक्ष प्रदीप ठाकरे यांच्या प्रयत्नातून क्रियाशील प्रेस क्लबच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
यावेळी क्रियाशील प्रेस क्लबचे रायगड जिल्हा अध्यक्ष सय्यद अकबर, उपाध्यक्ष प्रदीप ठाकरे, कोषाध्यक्ष चंद्रकांत शिर्के, सदस्य भूषण साळुंखे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाभली. सायकलिंग या क्रीडा प्रकाराचा प्रसार करून शारीरिक स्वास्थ्य आणि पर्यावरण संतुलन असे दोन्ही इप्सित ही संस्था साधत असते. सायकल चालवण्याची सवय लावल्याने मनुष्याचे शारीरिक स्वास्थ्य अबाधित राहते तसेच इंधन ज्वलन करणारी वाहने टाळल्याने कार्बन उत्सर्गाला अटकाव केला जातो. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रनथॉन सायकलिंग ग्रुप यांच्या वतीने क्रियाशील प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सय्यद अकबर यांना सन्मानित करण्यात आले.
भारत सरकारच्या क्रीडा प्राधिकरणाकडून देण्यात येणारे हे प्रशस्तीपत्र अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. प्रशस्तीपत्र बहाल केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना क्रियाशील प्रेस क्लबचे रायगड जिल्हाध्यक्ष सय्यद अकबर म्हणाले की, रनथॉन सायकलिंग ग्रुपचे कौतुक करावे तितके थोडे आहे. संस्थापक पुरणसिंग मेहरा यांनी गेल्या ११ वर्षांमध्ये अक्षरशः एखाद्या कुटुंब प्रमुखाप्रमाणे या संस्थेचे पालन पोषण केले आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या ध्येय धोरणानुसार ही संस्था कार्यरत असल्याबद्दल मला त्यांचा अभिमान वाटतो. भविष्यामध्ये या संस्थेला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा फक्त एका हाकेच्या अंतरावर आम्ही पत्रकार त्यांच्यासाठी धावून येऊ असा विश्वास तुम्हा सर्वांना देतो. आपल्या विभागातील एका प्रामाणिक संस्थेला थेट केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या माध्यमातून सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे मला असे वाटते की त्यांनी पनवेलच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला आहे. तसेच सय्यद अकबर यांनी सुदृढ आयुष्याच्या साठी सायकलिंगचे महत्व उपस्थितांना विशद केले.
यावेळी सायकलिंग ग्रुपचे सायकल स्वार साजन शहा, हेमंत जंगम, आदिती पाटिल , जनेत लॉरेन्स, अनीता खेडेकर, क्रिती गुप्ता यांच्यासह सायकलिंग ग्रुपची यशस्वी भागदौड पुढच्या पिढीमध्ये घेऊन जाणारे छोटे सायकल वीर देखील उपस्थित होते. तर क्रियाशील प्रेस क्लबच्या वतीने चंद्रकांत शिर्के, प्रदीप ठाकरे, भूषण साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच जनेत लॉरेन्स यांनी सर्व मान्यवरांसह सहभागी स्पर्धकांचे आभार मानले.