
चिपळूणच्या सूनबाई सुप्रीम कोर्ट
बार असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी
चिपळूण : येथील ॲड. अमोल सुधीर चितळे यांच्या पत्नी प्रख्यात विधिज्ञ ॲड. प्रज्ञा बघेल-चितळे या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी विराजमान झाल्या आहेत. नुकत्याच झालेल्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत त्यांनी १२४१ मते मिळवत दणदणीत विजय संपादन केला. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या इतिहासात गेल्या ७५ वर्षातील सौ. बघेल-चितळे या चौथ्या महिला सेक्रेटरी ठरल्या आहेत. त्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सुप्रीम कोर्ट बार असोसिएशन तसेच मुंबई हायकोर्ट असोसिएशनकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. चिपळूणमधील अनेक तरुण वकिली क्षेत्रात काम करत असून रत्नागिरी जिल्ह्यासह मुंबई उच्च न्यायालय, तसेच सर्वोच्च न्यायालयात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. त्यामुळे विधी क्षेत्रात चिपळूणचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. आता चिपळूणच्या सूनबाई देखील या क्षेत्रात उच्च भरारी घेताना दिसत आहेत. चिपळूण येथील प्रसिद्ध वकील कै. ॲड. सुधीर चितळे यांचे सुपुत्र ॲड. अमोल चितळे हे सर्वोच्च न्यायालयात काम करत आहेत. काही वर्षांपूर्वी त्यांनी ख्यातनामक वकील प्रज्ञा बघेल यांच्याशी प्रेमविवाह केला. त्यामुळे ॲड. प्रज्ञा बघेल या चिपळूणच्या सूनबाई बनल्या.
दरम्यान नुकतेच सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सेक्रेटरी या पदासाठी प्रज्ञा बघेल-चितळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. स्वतः प्रज्ञा बघेल व त्यांचे पती अमोल चितळे यांनी या निवडणुकीत प्रचंड मेहनत घेतली. त्यांना मोठ्या प्रमाणात सहकार्यही मिळाले. या निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदानही घेण्यात आले. एकूण २६०० मतदानापैकी चिपळूणच्या सूनबाई असलेल्या प्रज्ञा बघेल-चितळे यांना तब्बल १२४१ मते मिळाली, तर ५४१ मतांची आघाडी घेत त्यांनी समोरच्या उमेदवाराचा पराभव केला. अशा प्रकारे चिपळूणच्या सूनबाई असलेल्या प्रज्ञा बघेल या सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या सेक्रेटरीपदी विराजमान झाल्या. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनच्या गेल्या ७५ वर्षीच्या इतिहासात सेक्रेटरीपदी विराजमान होणाऱ्या त्या चौथ्या महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.