
नक्षल कमांडरसह दोन महिला व पुरूष दलम सदस्यांना कंठस्नान
चौघांवर एकूण 41 गुन्ह्यांची नोंद
नक्षल कमांडरसह दोन महिला व पुरूष दलम सदस्यांना कंठस्नान
चौघांवर एकूण 41 गुन्ह्यांची नोंद
प्रतिकूल परिस्थितीत 36 तास अभियान
घटनास्थळावरुन चार बंदुका जप्त
चकमक, खून, जाळपोळीचे गुन्हे
गडचिरोली : एकीकडे छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांनी आक्रमक पवित्रा घेऊन नक्षलवाद्यांना सळो की पळो करून सोडले असताना इकडे गडचिरोली पोलिसांनीही नक्षलविरोधी अभियान तीव्र केले आहे. छत्तीसगड सीमावर्ती भागात हे अभियान राबवले जात असताना पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या माओवाद्यांना पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात दलम कमांडर दर्जाच्या वरिष्ठ कॅडरसह तीन दलम सदस्यांचा पोलिसांच्या गोळ्यांनी वेध घेतला. या दलम सदस्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. या नक्षलवाद्यांचे मृतदेह हेलिकॅाप्टरने गडचिरोलीत आणून शवपरिक्षण करण्यात आले.
मारल्या गेलेला दलम कमांडर सन्नु मासा पुंगाटी (35 वर्षे) रा.कवंडे, ता.भामरागड याच्यावर 8 लाखांचे, तर इतर तीन सदस्यांवर प्रत्येकी 2 लाखांचे असे एकूण 14 लाख रुपयांचे ईनाम शासनाने ठेवले होते. या सर्वांवर मिळून विविध पोलीस स्टेशनमध्ये 41 गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी शुक्रवारी सायंकाळी पत्रपरिषदेत दिली. यावेळी पोलीस उपमहानिरीक्षक (गडचिरोली परिक्षेत्र) अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश तथा अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) कार्तिक आदि प्रामुख्याने उपस्थित होते.
महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवर उपविभाग भामरागडअंतर्गत नव्याने स्थापन करण्यात आलेल्या कवंडे पोलीस स्टेशनच्या हद्दीत विध्वंसक कारवाया करून घातपात घडविण्याच्या उद्देशाने काही माओवादी दबा धरून बसले असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम.रमेश यांच्या नेतृत्वात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाच्या 12 तुकड्या आणि सीआरपीएफ 113 बटालियनच्या कंपनी-डी ची एक तुकडी दि.22 रोजी दुपारी कवंडे आणि नेलगुंडा येथून इंद्रावती नदीच्या काठावरील परिसरात माओवादविरोधी अभियान राबविण्यासाठी रवाना करण्यात आली होती.
अवघड जंगल परिसर आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत या चमुंनी दि.23 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास जंगल परिसरात घेराव करुन शोध अभियान राबवित असताना जंगलात दबा धरून बसलेल्या माओवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व शस्रास्र लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने गोळीबार सुरु केला. पोलिसांनी माओवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येण्याचे आवाहन केले, मात्र माओवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर पुन्हा गोळीबार सुरू केला. त्यामुळे जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वसंरक्षणासाठी माओवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
सुमारे दोन तास चाललेल्या चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर 2 पुरुष आणि 2 महिला असे एकुण 4 माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांची ओळख पटविण्यात यश आले.
8 लाखांचे इनाम असलेला सन्नू मासा पुंगाटी (35 वर्ष) हा कवंडे येथील रहिवासी असून तो भामरागड दलम कमांडर म्हणून कार्यरत होता. अशोक ऊर्फ सुरेश पोरीया वड्डे (38 वर्ष) हा भामरागड दलमचा सदस्य आणि कवंडे गावचा रहिवासी होता. विज्यो होयामी (25 वर्ष) ही छत्तीसगडच्या पोडिया गावातील रहिवासी होती. तर करुणा ऊर्फ ममिता ऊर्फ तुणी पांडू वरसे (21 वर्ष) ही भामरागड तालुक्यातल्या गोंगवाडाची रहिवासी होती.
घटनास्थळावरुन एक एस.एल.आर., दोन .303 रायफल आणि एक भरमार अशा 4 बंदुका, वॉकीटॉकी, माओवादी साहित्य व इतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश आले आहे.
हे माओवादविरोधी अभियान अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ.छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक (नक्षलविरोधी अभियान) नागपूर संदीप पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र अंकित गोयल, पोलीस उप-महानिरीक्षक (अभियान) सीआरपीएफ अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक (गडचिरोली) नीलोत्पल, कमांडंट 113 बटा. सीआरपीएफ जसवीर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) एम. रमेश यांच्या नेतृत्वात सी-60 आणि सीआरपीएफ 113 बटा.डी कंपनीच्या जवानांनी यशस्वीपणे पार पाडले.
सन 2021 पासून गेल्या चार वर्षात गडचिरोली पोलिसांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे 87 कट्टर माओवाद्यांना कंठस्नान, 124 माओवाद्यांना अटक करण्यात आली आहे, तर 63 माओवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी सदर भागात माओवादविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून पुन्हा एकदा सर्व माओवाद्यांना आत्मसमर्पण करुन आपले जीवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे