
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात लवकरच अधिकृत उमेदवाराची घोषणा!
अकोला /शकील खान :-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची विदर्भ कार्यकारी मंडळाची महत्त्वपूर्ण सभा अलीकडेच अकोला येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. या सभेला शिक्षक आमदार तसेच संघाचे सरकार्यवाहक आमदार सुधाकर अडबाले, माजी आमदार व महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे सरचिटणीस व्ही.यू. डायकव्हाणे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताध्यक्ष अरविंद देशमुख होते.
सभेची सुरुवात सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागताने झाली. यानंतर विषयपत्रिकेनुसार महाराष्ट्र विधान परिषदेचे अधिवेशन ३० जून २०२५ पासून सुरू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर संघटनेच्या विविध मागण्यांबाबत तारांकित लक्षवेधी प्रश्न मांडण्याची दिशा ठरवण्यात आली. संघटनेकडे आलेल्या शिक्षकांच्या समस्या सभागृहात प्रभावीपणे मांडण्यासाठी पाठपुरावा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभासद नोंदणीसाठी विशेष अभियान राबविण्याचा निर्धार करण्यात आला तसेच नोंदणी प्रक्रियेचा सविस्तर आढावाही घेण्यात आला. १५ मार्चच्या संचमान्यतेसह शिक्षण क्षेत्रातील इतर ज्वलंत मुद्द्यांवरही सखोल चर्चा झाली. या प्रश्नांवर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.
अमरावती विभागातील सर्व जिल्हा व तालुका अधिवेशनांचे आयोजन व कार्यकारिण्यांच्या निवड प्रक्रियेबाबतही निर्णय घेण्यात आले. तसेच राज्य महामंडळात संघटनेचे प्रतिनिधी पाठविण्याबाबत ठराव संमत करण्यात आला.
या वेळी मार्गदर्शन करताना आमदार सुधाकर अडबाले यांनी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघासाठी लवकरच विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या घटना नुसार आणि लोकशाही प्रक्रियेतून सक्षम उमेदवार जाहीर केला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले.
या सभेला प्रांतीय उपाध्यक्ष रमेश काकडे, जयदीप उर्फ जयकुमार सोनखासकर, विजय ठोकळ, विभागीय कार्यवाह चंद्रशेखर रहांगडाले, कोषाध्यक्ष भूषण तल्हार, अकोला जिल्हाध्यक्ष जी.आय. शहा, कार्यवाह नितीन गायकवाड, महानगराध्यक्ष अजय काळे, अमरावती जिल्हाध्यक्ष दशरथ रसे, कार्यवाह आशिष इंगळे, अमरावती महानगराध्यक्ष अतुल देशमुख, कार्यवाह अरविंद चौधरी, यवतमाळ जिल्हाध्यक्ष पवन बन, बुलढाणा जिल्हाध्यक्ष विष्णू अवचार, कार्यवाह सतीश शेळके, नागपूर जिल्हाध्यक्ष अनिल गोतमारे, कार्यवाह संजय वारकर, नागपूर शहराध्यक्ष विठ्ठल जुनघरे, कार्यवाह अविनाश बढे, चंद्रपूर ग्रामीण कार्यवाह सुनील शेरकी, दिगंबर कुरेकर, सुरेंद्र अडबाले, वर्धा जिल्हाध्यक्ष विष्णू ईटनकर, कार्यवाह महेंद्र सालनकर, भंडारा जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, कार्यवाह राजेश धुर्वे, गडचिरोलीचे रवींद्र नैताम, कार्यवाह अजय लोंढे, गोंदिया जिल्ह्यातून दीपक थोपटे आणि ए.एस. गुप्ता यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. अशी माहिती जयदीप सोनखास्कर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.