logo

गडचिरोली प्रकल्पातील 11 शासकीय आश्रमशाळांचा निकाल 90 टक्क्यांवर अंगारा आश्रमशाळेची सानिया प्रथम


गडचिरोली प्रकल्पातील 11 शासकीय आश्रमशाळांचा निकाल 90 टक्क्यांवर
अंगारा आश्रमशाळेची सानिया प्रथम

-May 15, 2025


गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय आश्रमशाळांनी कॉपीमुक्त वातावरणातही यंदा दहावीचा उत्कृष्ट निकाल दिला. गडचिरोली प्रकल्पातील 24 शासकीय आश्रमशाळांपैकी 11 शासकीय आश्रमशाळांचा निकाल 90 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यात 7 शासकीय आश्रमशाळांचा निकाल 80 टक्के ते 90 टक्केच्या दरम्यान आहे. प्रकल्पातील 24 शासकीय आश्रमशाळांचा सरासरी निकाल 84.74 टक्के आहे.

गडचिरोली प्रकल्पातील अंगारा शासकीय आश्रमशाळेची विद्यार्थिनी सानिया पतीराम ताराम हिने 79 टक्के गुण घेऊन प्रकल्पात प्रथम क्रमांक पटकाविला. मार्कंडादेव शासकीय आश्रमशाळेचा समीर राजकुमार गेडाम 78.40 टक्के गुण घेऊन दुसरा, तर गडचिरोलीच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेची वैष्णवी रणजित मडावी हिने 78.20 टक्के गुण घेऊन तिसरा क्रमांक पटकाविला आहे.

सर्वात जास्त 95.74 टक्के निकाल रामगड शासकीय आश्रमशाळेचा लागला. दुसऱ्या क्रमांकावर गडचिरोली शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेचा निकाल 95.56 टक्के आहे. त्याखालोखाल कुरंडीमाल (94.29), भाडभिडी (93.62), मार्कंडादेव (93.18), येंगलखेडा (92.59), कारवाफा (92.00), सावरगाव (91.67), गोडलवाही (91.30), पोटेगाव (90.24) आणि कोरची (90.24) या शासकीय आश्रमशाळांचा निकाल 90 टक्केच्या वर आहे. सर्वात कमी निकाल 33.33 टक्के ग्यारापत्ती शासकीय आश्रमशाळेचा आहे.

सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित यादव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.

16
1059 views