logo

सामान्य माणुस स्वावलंबी बनवणे हीच खरी संविधान आणि म.गांधींची इच्छा-तुषार गांधी


नांदेड/प्रतिनिधी-देशातील सामान्यातला सामान्य माणसाला स्वावलंबी आणि आत्मसन्मानित करणे हीच खरी महात्मा गांधी आणि संविधान लिहिणार्‍या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची इच्छा होती. असे मत महात्मा गांधींचे पणतु तथा लेखक, विचारवंत तुषार गांधी यांनी व्यक्त केले.
‘हम भारत के लोग’ या चळवळीचा पहिला जनसंवाद काल नांदेडमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय संविधान आणि माझी जबाबदारी या विषयावर महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खा.डॉ.व्यंकटेश काब्दे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून खा.रविंद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी बोलतांना तुषार गांधी म्हणाले की, अलिकडच्या काळात भारतीय नागरिकांना स्वावलंबी करण्यापेक्षा परावलंबी करण्याचा कार्यक्रम सुरु आहे. महात्मा गांधी आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील सर्वसामान्य माणसाला आत्मसन्मान मिळाला पाहिजे. तो स्वावलंबी झाला पाहिजे. मात्र त्या देशात पंधराशे रुपयाला मत विकल्या जाते ही मोठी शोकांतीका आहे. एकदा मतदान केले की, आपले काम संपले असे नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक काम करुन घेणे ही देखील आपली जबाबदारी आहे. महात्मा गांधी व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाधिष्ठीत लोकशाहीचा आग्रह धरला. आज साध्या-साध्या कामासाठी सर्वसामान्य व्यक्तीला आमदार, खासदार, लोकप्रतिनिधीकडे शिफारस पत्रे मागावी लागत आहेत. हे स्वावलंबन नाही. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकार आणि कर्तव्याची जाणिव सर्वसामान्यांना असली पाहिजे. सध्या भारत-पाकिस्तान या दोन देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्हाला युद्ध नकोच आहे. परंतु कोणी आमच्या विरुद्ध षडयंत्र करत असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर देण्याची गरज आहे. कुरापतखोर पाकिस्तानला धडा शिकवलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. परंतु अमेरिकेसारख्या देशाच्या सांगण्यावरुन युद्ध थांबवण्याचा निषेध आम्ही करीत आहोत. असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
‘हम भारत के लोग’ या संघटनेविषयी बोलतांना ते म्हणाले की, आम्ही निवडणुका लढवणार नाहीत परंतु धर्मनिरपेक्ष, पुरोगामी आणि समविचारी राजकीय पक्षांना बळ देण्याची भूमीका ‘हम भारत के लोग’ च्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे. या कामाची सुरुवात नांदेडमधून होत आहे. भविष्यात प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात पोहचण्याचा आणि तेथील लोकांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्षीय समारोपात डॉ.व्यंकटेश काब्दे यांनी तुषार गांधी यांच्या संकल्पनेचे स्वागत करुन शुभेच्छा दिल्या. तर खा.रविंद्र चव्हाण यांनी संसद आणि संसदेच्या बाहेर संविधानाची होत असलेली अवहेलना याबद्दल चिंता व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्याम निलंगेकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.अल्ताफ हुसेन यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.उज्ज्वला पडलवार यांनी केले. यावेळी माजी उपमहापौर आनंद चव्हाण, कॉंग्रेसचे एकनाथ मोरे, कॉ. विजय गाभणे, ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर, डॉ.रेखाताई चव्हाण, प्रा.विजय माहुरे, ऍड.सुरेंद्र घोडजकर, ऍड.धोंडीबा पवार, प्रा. डॉ. लक्ष्मण शिंदे, प्रा.शिवदास हामंद, डॉ.पुष्पा कोकीळ, डॉ बालाजी पेनुरकर कॉ. गंगाधर गायकवाड, ऍड.प्रशांत कोकणे, डॉ. अनिल सिरसाट, प्रा.डॉ.प्रल्हाद हिंगोले, कॉ. शिवाजी फुलवळे, नवनीत गांधी, प्रा. हणमंलू तमलूरकर, प्रदिपकुमार जैन, शकीला शेख, कॉ. दिगंबर घायाळे, सौ. किर्ती ताई पांडे, सौ. उज्वला गुरसुडकर, प्रभाकर हिंगोले, कॉ. जयराज गायकवाड, कॉ सुभाषचंद्र गजभारे, शेख इमदाद भाई, कैलास शिंदे, मुरलीधर कांबळे, कॉ.देवराव नारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0
0 views