logo

बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद वाळूच्या टिप्परने दुचाकीला उडवले; दोन चिमुकल्यांचा मृत्यू, संतप्त नागरिकांनी टिप्परला ,आग लावली .


मन्सूर शहा (चिखली ): बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील माऊली फाटा येथे शुक्रवारी (दि. ९ मे २०२५) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक हृदयद्रावक अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्परने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन लहान मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील आजी-आजोबा गंभीर जखमी झाले. या घटनेने परिसरात तीव्र संताप उसळला असून, संतप्त नागरिकांनी टिप्परला आग लावली. यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, पळशी सुपो (ता. जळगाव जामोद) येथील प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर हे दाम्पत्य आपल्या दोन नातवांसह दुचाकीने शेगावकडे निघाले होते. मृत मुलांची नावे पार्थ चोपडे (वय ६, रा. अमरावती) आणि युवराज मोहन भागवत (वय ६, रा. बडनेरा, अमरावती) अशी आहेत. माऊली फाटा येथे मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रेतीच्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले. दोन्ही मुलांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रकाश आणि साधना खेडकर गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांचा उद्रेक आणि टिप्परला आग
या हृदयद्रावक घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दोन निष्पाप मुलांचा मृत्यू आणि टिप्परच्या बेदरकार वाहतुकीमुळे नागरिकांचा संताप अनावर झाला. संतप्त जमावाने टिप्परला आग लावली, त्यामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. जळगाव जामोद पोलिस ठाण्याचे ठाणेदार आणि कर्मचारी तसेच खामगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक श्रेणिक लोढा यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी टिप्परचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातास कारणीभूत ठरलेला टिप्पर अवैध रेती वाहतूक करत होता. बुलडाणा आणि जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीमुळे यापूर्वीही अनेक अपघात घडले आहेत. भरधाव वेगाने धावणारे टिप्पर आणि डंपर यांच्यामुळे रस्त्यांवर सतत धोका निर्माण होत आहे. या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाकडे अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे. “अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर नियंत्रण ठेवले गेले नाही, तर अशा घटना पुन्हा घडतील,” अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.

5
3670 views