
सैन्याचे मनोबल उंचावण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आज ‘तिरंगा रॅली’ चे आयोजन
यवतमाळ – काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तानमधील दहशतवादी कारवायांची केंद्र उध्वस्त केले. त्यानंतर सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीत शत्रुराष्ट्राला भारतीय सैन्य कडवी झुंज देत आहेत. अशावेळी राष्ट्रप्रथम ही भावना मनात बाळगून सर्व भारतीय जनता सैन्यासोबत आहे, हा संदेश देण्यासाठी शिवसेनेच्या वतीने ‘तिरंगा रॅली’ काढून सैन्यास मानवंदना दिली जाणार आहे.
शिवसेना पक्ष मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून उद्या रविवार, दि ११ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना पक्षातर्फे, भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना अर्पण करण्यासाठी ‘तिरंगा रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे.
यवतमाळ येथे राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात ही रॅली काढण्यात येणार आहे. येथील गार्डन रोडवर नाट्यगृहाच्या शेजारी शिवाजी महाराज पुतळ्याजवळून सकाळी ८.३० वाजता ही रॅली निघणार आहे. यवतमाळ शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत सीमेवरील सैन्याला मानवंदना दिली जाणार आहे. त्यानंतर संविधान चौकात रॅलीचा समारोप होणार आहे. सध्याच्या युद्धजन्य स्थितीच्या काळात देशातील सैन्याचे मनोबल वाढविण्याकरीता सर्वधर्मीय, सर्वपक्षीय संघटना, समाजिक संस्था, कर्मचारी, विद्यार्थी, युवकांसह, शेतकरी, व्यापारी, महिला भगिनी, नागरिकांसह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी पदाधिकाऱ्यांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, माजी जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी केले आहे.