logo

ठाणेदार केशव ठाकरे प्रकरणाची चौकशी थंडबस्त्यात?



मनसे विद्यार्थी सेनेचा आरोप

आय जी यांना पाठवले निवेदन

यवतमाळ :"सर" संबोधन न केल्याच्या कारणावरून डिलिव्हरी बॉयला मारहाण करणाऱ्या आर्णी पोलिस ठाण्याचे ठाणेदार केशव ठाकरे यांच्या विरोधातील चौकशी थंडबस्त्यात गेल्याचा आरोप मनसे विद्यार्थी सेनेने केला आहे. या प्रकरणात अद्याप ठोस कारवाई न झाल्यामुळे चौकशी प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी आर्णी येथे एका डिलिव्हरी बॉयने ठाकरे यांना "सर" न म्हटल्यामुळे झालेल्या मारहाणीमुळे त्याला गंभीर मानसिक व शारीरिक त्रास झाला होता. या घटनेची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार सादर करत संबंधित ठाणेदारावर कारवाईची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस अधीक्षक, दारव्हा विभाग यांनी संबंधित तक्रारदाराला १७ एप्रिल रोजी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र, पत्र देण्यात येण्याचा वेळ रात्री १२ वाजताचा होता, तर दुसऱ्या दिवशी त्यांचे आधीच नियोजित काम असल्यामुळे ते हजर राहू शकले नाहीत. त्यांनी यासंदर्भात लेखी पत्राद्वारे माहितीही दिली होती. मात्र त्यानंतर त्यांना चौकशीसाठी पुन्हा संपर्क करण्यात आलेला नाही, अशी माहिती त्यांनी दिली. या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त करत मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, अमरावती परिक्षेत्र यांच्याकडे निवेदन सादर केले. त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. यावेळी प्रथमेश पाटील, अमितेश आडे, साहिल जतकर, साईराम कवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

....चौकट...
"सदरक्षणाय खलनिग्रनाय" हे ब्रीद विसरलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर जरब बसवण्याची गरज आहे, अन्यथा जनतेचा पोलिसांवरील विश्वास डळमळीत होईल," अशी प्रतिक्रीया मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी दिली.

1
104 views