
जनता विद्यालयात वार्षिक निकाल जाहीर
जनता विद्यालयात वार्षिक निकाल जाहीर
गुणवंत विद्यार्थ्यांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार
पिंपळगाव सराई, दि. ६ मे (प्रतिनिधी):
जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ चा वार्षिक निकाल जाहीर करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. ६ मे रोजी झालेल्या या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीच्या निकालांची घोषणा करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. पाचवी ते आठवीचे निकाल परीक्षाप्रमुख सुदाम चंद्रे यांनी वाचून दाखवले, तर नववीचा निकाल परीक्षाप्रमुख सुहास कुलकर्णी यांनी सादर केला. इयत्ता अकरावी व बारावीचे निकाल प्रा. सुधाकर सास्ते यांनी वाचून दाखवले.
गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. पालक व ग्रामस्थांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थ्यांमुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेला बळकटी मिळाल्याचे मत अनेक शिक्षकांनी व्यक्त केले.
प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा दिल्या. "ज्यांचे गुण अपेक्षेनुसार आले नाहीत, त्यांनी खचून न जाता अधिक मेहनत करून पुढील वर्षी चांगले यश मिळवावे," असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास पर्यवेक्षक संजय पिवटे, सर्व शिक्षकवृंद तसेच गावातील अनेक मान्यवर पालक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.