logo

*अहिल्यानगर मधील चोंडीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त पार पडली मंत्रिमंडळाची बैठक*

प्रतिनिधी (६ मे, अहिल्यानगर) - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज अहिल्यानगर मधील चोंडी येथे पार पडली. या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह ४२ मंत्री उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीस अभिवादन केले.

या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृतीस्थळ जतन आणि संवर्धन करण्यासाठी ६८१ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. यातून विविध प्रकारची कामे केली जातील. तसेच अखिल भारतीय स्तराचे प्रेरणास्थळ, तीर्थस्थळ तयार करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक तीर्थांच्या विकासासाठी ५५०३ कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मान्यता मिळाली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन तसेच त्यांचे कार्य त्यांचा इतिहास पूर्ण जगाला माहिती व्हावा यासाठी त्यांच्या जीवनावर बहुभाषिक कमर्शियल चित्रपट करण्याचा निर्णय या बैठकीत झाला. अहिल्यानगर मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली. तसेच अहिल्यानगर मध्ये खास मुलींसाठी आयटीआय ची घोषणा करण्यात आली.

या बैठकीसाठी अहिल्यानगर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली होती. बैठकीसाठी वातानुकूलित मोठा हॉल तयार करण्यात आला होता. यामध्ये सर्वांसाठी प्रशस्त अशी आसन व्यवस्था करण्यात आली होती. मंत्रिमंडळ बैठक होणार असल्यामुळे अहिल्यानगर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जे मंत्री हेलिकॉप्टरने येतील त्यांच्यासाठी हॅलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. या बैठकीसाठी आलेल्या मंत्र्यांच्या भोजनासाठी कर्जत मधील प्रसिद्ध शीपी आमटी, मासवडी, पुरणपोळी, चुलीवरची भाकरी आणि चपाती, हुलग्याची उसळ, मटकीची उसळ, खारे वांगे अशा पद्धतीचे गावरान जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.

58
6557 views