logo

मिनी ट्रकची दुचाकीला धडक, तरुणाचा मृत्यू तालखेड फाट्यावरील घटनाः एक गंभीर जखमी



मलकापूर - ओव्हरटेकच्या नादात

भरधाव मिनीट्रकने दुचाकीला धडक दिल्याची घटना मलकापूर- बुलढाणा रस्त्यावर ५ रोजी दुपारी १२.२० च्या सुमारास तालखेड फाट्यावर घडली. या अपघातात दुचाकीस्वार युवकाचा जागीच ठार झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतक युवकाचा नुकताच साक्षगंध पार पडला होता. बोहल्यावर चढण्यापूर्वीच मृत्यु, झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

तालुक्यातील दाताळा येथील रहिवासी अजय संजय कावणे (२७) हा दुचाकीने घरी परतत होता. दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास विरुध्द दिशेने ओव्हरटेकच्या नादात भरधाव मिनीट्रक क्र.एम.एच. १९ ए. वाय. ०९३०) ने दुचाकी क्र.एम.एच. १९ डी. एस. ६०४१) ला जोरदार धडक दिली.

अपघातानंतर मृतक अजय कावणे व गंभीर जखमी सुरेश मुरली लोखंडे (५६, रा. वडगाव, ता. मोताळा) या दोघांना मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, गंभीर जखमी सुरेश लोखंडे यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे हलविण्यात आले आहे, तर मृतकाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. या घटनेतील मिनीट्रक चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला, पुढील तपास पोलिस करीत आहेत.

*बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाची झड़प !*

बुलढाणा रस्त्यावरील तालखेड फाट्यानजीक घडलेल्या अपघातात युवक अजय कावणे याचा दुर्देवी मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वीच त्याचा साक्षगंध झाला होता आणि लवकरच तो विवाहबंधनात अडकणार होता. मात्र नियतीने त्याच्या आयुष्याची दोरी वेळेपूर्वीच कापली,

या घटनेमुळे वधूपक्षावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मृतकाच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

17
4054 views