logo

दर फलक नाही; नागरिकांची लूट सुरू – आपले सरकार सेवा केंद्रांवर गंभीर आरोप

गडचिरोली (प्रतिनिधी) – गडचिरोली जिल्ह्यातील विविध तालुके तसेच गावांमध्ये सुरू असलेल्या ‘आपले सरकार सेवा केंद्रां’तून नागरिकांची खुलेआम लूट होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा सचिव तथा सामाजिक कार्यकर्ते श्री. नीलकंठ कवडुजी संदोकर यांनी केला आहे.

आपले सरकार सेवा केंद्रांमध्ये नागरिकांना मिळणाऱ्या सेवा व त्यासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काची माहिती देणारा सूचना फलक किंवा दर फलक कुठेही लावलेला नाही. त्यामुळे नागरिकांना दरांची माहिती नसल्याने अनेक ठिकाणी मनमानी शुल्क आकारले जात आहे, असे त्यांनी सांगितले.

“कोणतेही दाखले घ्या, आधार कार्ड अपडेट करा, प्रत्येक कामासाठी १०० रुपये पर्यंत जास्त पैसे घेतले जात आहेत. काही ठिकाणी सेवा केंद्र चालकांकडून नागरिकांशी उद्धट वागणूक दिली जात आहे,” असा आरोप संदोकर यांनी केला.

या प्रकरणात उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांनी त्वरित लक्ष घालून चौकशी करावी, प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्रात दर फलक व सूचना फलक लावण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा शिवसेना स्टाईलने प्रत्येक तहसील कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

84
2450 views