logo

पित्याच्या हातून पोटच्या लेकराचा मृत्यू ! किडंगीपारमधील हृदयद्रावक घटना

आमगाव – “जन्म दिला ज्याने, त्याच्याच हातून अंत!” – ही काळीज पिळवटून टाकणारी घटना तालुक्यातील किडंगीपार गावात बुधवारी (दि. ३० एप्रिल) रात्री घडली. क्षुल्लक घरगुती वादातून पित्याने आपल्या पोटच्या गोळ्याचा – रमेश नामदेव बागडे (वय ३५) – स्वयंपाकघरातील दगडाच्या वरवंट्याने डोक्यावर घाव घालून जागीच खून केला.

वयाची पन्नाशी ओलांडणाऱ्या नामदेव बागडे (वय ५५) याच्या रागाच्या भरात झालेल्या या क्रूर कृत्यामुळे केवळ एका कुटुंबाचा नव्हे, तर संपूर्ण गावकऱ्यांच्या मनाचा थरकाप झाला आहे.
रात्री घरात झालेल्या किरकोळ वादाने काही क्षणांतच उग्र रूप घेतले. संतप्त झालेल्या नामदेवने स्वयंपाकघरातील वरवंटा उचलून मुलाच्या डोक्यावर जबरदस्त वार केला. रक्ताच्या थारोळ्यात रमेश कोसळला आणि काही क्षणांतच त्याने जीव सोडला.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. आमगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नीलेश डाबेराव यांनी पोलिस पथक सहभागी हवालदार पोपेस जामभुळकर व स्वप्निल शेंडे यांच्यासह घटनास्थळी धाव घेत आरोपी वडिलास अटक केली. रमेशच्या मागे दोन चिमुरड्या मुली आहेत. वडिलांच्या मृत्यूने त्यांचे बालपण अंधारात ढकलले गेले आहे. त्यांच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रूंमध्ये त्यांच्या पुढच्या जीवनाची वेदना स्पष्ट दिसते.

मृतदेह आमगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.
ही घटना केवळ एक खून नव्हे, तर भारतीय कुटुंबसंस्थेतील संवाद हरवण्याचे आणि संयम संपण्याचे गंभीर उदाहरण आहे. छोट्या कारणांवरून तणावाचा स्फोट होणे, रक्ताच्या नात्यांची वीण तुटणे आणि शोकांतिका घडणे – यामुळे सामाजिक जागृतीची नितांत गरज अधोरेखित होते.

14
293 views