logo

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा


पोलीस इन्स्पेक्टर चरणसिंग राजपूत यांचा शाळेच्या वतीने सत्कार

पिंपळगाव सराई, ता. बुलढाणा | दिनांक १ मे २०२५ रोजी जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळगाव सराई येथे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते, तर प्रमुख उपस्थित म्हणून जनता प्राथमिक विद्या मंदिराच्या मुख्याध्यापिका सौ. निर्मला खुर्दे यांची उपस्थिती लाभली. विशेष अतिथी म्हणून अमरावती शहर पोलीस इन्स्पेक्टर चरणसिंग अवघडे राजपूत उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर ध्वजारोहण विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पाटोळे यांनी केले.

याप्रसंगी पोलीस इन्स्पेक्टर चरणसिंग राजपूत यांचा विद्यालयाच्या वतीने प्राचार्य ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर विद्यालयाचे पर्यवेक्षक भगवानराव आरसोडे यांना 'आदर्श विद्यालय' येथे उपप्राचार्य पदावर पदोन्नती मिळाल्याबद्दल प्राचार्य व सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी संयुक्तपणे त्यांचा सत्कार केला.

आपल्या मनोगतात चरणसिंग राजपूत म्हणाले, "मुलांना आपल्या शाळेतून योग्य संस्कार मिळाल्यास त्यांचात कधीच गुन्हेगारी पद्धती येणार नाही." त्यांच्या या विचाराने उपस्थितांमध्ये जागरूकतेचा सुसंस्कार निर्माण झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद ठोंबरे म्हणाले, "महाराष्ट्र राज्य नाही तर ती समृद्ध परंपरा आहे." त्यांनी महाराष्ट्र दिनाचे ऐतिहासिक महत्त्व सांगताना राज्य स्थापनेचा इतिहास विद्यार्थ्यांना समजावून सांगितला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. वैशाली मांजाटे यांनी तर आभार प्रदर्शन नवनिर्वाचित पर्यवेक्षक संजय पीवटे यांनी केले. याप्रसंगी सल्लागार समिती सदस्य भाऊसिंगजी सोळंके, सदाशिवराव शिंदे, विठ्ठलभाऊ सोनुने, रमेश खंडारे यांचीही उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साही, प्रेरणादायी आणि स्मरणीय ठरला.

26
2537 views