logo

माण-खटावात पाण्यासाठी संतप्त आंदोलन; ३० एप्रिलला म्हसवडमध्ये अर्धनग्न रास्ता रोको


सातारा (म्हसवड ता. माण ) प्रतिनिधी –
सातारा जिल्ह्यातील अतिदुष्काळी माण व खटाव तालुक्यात पाण्याचा भीषण प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर, तारळी सिंचन योजनेतून नियमित कॅनॉलद्वारे पाणी मिळावे, या मागणीसाठी बुधवार, ३० एप्रिल रोजी म्हसवड येथे अर्धनग्न अवस्थेत रास्ता रोको आंदोलन छेडले जाणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून, नागरिक मोठ्या संख्येने जनावरांसह सहभागी होणार आहेत. "पाणी मागितल्याने जर आम्हाला चोर ठरवले जात असेल, तर आम्ही अटकेला सामोरे जाऊ; निदान तुरुंगात तरी पाणी मिळेल," अशी संतप्त प्रतिक्रिया महेश करचे यांनी व्यक्त केली.

तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या केवळ चार दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा होत आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्प, खराब पाइपलाइन आणि प्रशासकीय दुर्लक्ष यामुळे नागरिकांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचा कडेलोट झाला आहे.

प्रशासनाने आंदोलन थांबवण्यासाठी कॅनॉल परिसरात जमावबंदी लागू केली असली, तरी संतप्त नागरिकांनी कोणत्याही दबावाला न झुकता आंदोलन निश्चितपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

पाणीटंचाईचा प्रश्न केवळ तहान भागवण्यापुरता मर्यादित न राहता प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर आणि कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे. या आंदोलनाकडे संपूर्ण माण-खटाव तालुक्याचे लक्ष लागले असून, प्रशासनाने नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

26
1580 views