
अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती
मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान
अमळनेरात एकीकडे पशुपक्ष्यांसाठी हक्काचा निवारा तर दुसरीकडे अन्नपाण्यासाठी भटकंती
मंगळग्रह मंदिर परिसर ठरतोय पशुपक्ष्यांसाठी वरदान
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्यात एकीकडे उन्हामुळे व्याकुळ झालेले प्राणी, पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. ही धाव त्यांच्यासाठी जीवघेणीदेखील ठरत आहे. मात्र दुसरीकडे मंगळग्रह मंदिर परिसरात फुललेल्या वनराईमुळे वन्य प्राणी, पक्षींना हक्काचा निवारा मिळाल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
अलिकडे एक रातबगळ्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी पोलीस स्टेशनचा आश्रय घेतला मात्र त्याच दिवशी एका माकडाने येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिरात फुललेल्या वनराईचा आश्रय घेत येथील बहरलेल्या आंब्याच्या झाडावरील कैरींचा मनसोक्त आस्वाद घेतला. याठिकाणी रोज एक-दोन माकड येऊन कैऱ्यांवर ताव मारत असतात आणि पाणी पिऊन निघून जात असतात. मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले यांच्या मार्गदर्शनाने मंदिर परिसरात लावलेल्या आंब्यांच्या झाडांवर कैऱ्या व आंबे खाण्यासाठी पोपट व इतर पक्षीही येत आहेत. अनेक पक्षांचा याठिकाणी अधिवास असून या पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी, अंडी उबविण्यासाठी व पिल्लांच्या संरक्षणासाठी जवळपास शंभर मडकी झाडांवर बांधलेली आहेत. त्यामुळे या पक्ष्यांना चांगल्याप्रकारे आश्रय मिळत आहे. म्हणूनच याठिकाणी सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांची किलबिलाट अनुभवाला मिळत असते. जखमी पक्ष्यांवर याठिकाणी उपचार केले जातात व बरे झाल्यावर त्यांना नैसर्गिक सान्निध्यात सोडून दिले जाते. या ठिकाणी पशुपक्ष्यांसाठी बाराही महिने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असून त्याठिकाणी नियमित खाद्यही टाकले जाते. विशेष म्हणजे निर्भय होऊन ते सर्व खातात व पाणी पितात. एकही सेवेकरी पशुपक्ष्यांना इजा पोहचवत नाही. त्यामुळे एकही सेवेकऱ्याची त्या पशुपक्ष्यांना भीती वाटत नाही.
दुसरीकडे मात्र जानवे परिसरातील आरक्षित जंगले ओसाड पडलेले दिसून येत आहेत. याठिकाणी पाणवठे आहेत मात्र निधीअभावी त्याठिकाणी पाणी टाकले जात नाही. म्हणून येथील पाणवठे एवढ्या उन्हाळ्यातही कोरडेच आहेत. त्यामुळेच येथील पक्षी, प्राणी अन्नपाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घेत असतात. जीव वाचवण्यासाठीची ही घेतलेली धाव मात्र त्यांच्यासाठी जीवघेणी ठरत असते, हे मोठे दुर्दैव. गेल्या महिन्यात तीन-चार हरणांचा तर एका निलगायीचा वाहनांच्या धडकेने तसेच विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आरक्षित जंगले असूनही प्राण्यांचा, पक्ष्यांचा अन्नपाण्याविना मृत्यू होणे हे पक्षीमित्र, प्राणीमित्र तसेच वनविभागाचे अपयश म्हणावे का? असा सवाल सुज्ञांनी उपस्थित केला आहे.