logo

विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास व संवादकौशल्य वाढवण्यासाठी निळेश्वर विद्यालयात मुलाखत तंत्राचे प्रात्यक्षिक उपक्रम


सातारा (वडोली, ता. कराड )– येथील ज्ञान प्रसारक शिक्षण संस्था संचलित निळेश्वर माध्यमिक विद्यालयात रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त एक अभिनव उपक्रम राबवण्यात आला. पाचवी ते नववीतील सर्व विद्यार्थ्यांची मुलाखत तंत्रावर आधारित प्रात्यक्षिके घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धात्मक युगासाठी सज्ज करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या उपक्रमाची संकल्पना संस्थेचे अध्यक्ष सुरेश संकपाळ (भाऊ) यांच्या प्रेरणेने तर अंमलबजावणी विद्यालयाचे मुख्याध्यापक सचिन नलवडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या मुलाखती पालकांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या. या मुलाखतीत विद्यार्थ्यांच्या वाचनाची आवड, छंद, विचारशक्ती, निर्णयक्षमता, सभाधिटपणा आणि सामान्य ज्ञान या गोष्टींवर आधारित प्रश्न विचारण्यात आले.

प्रत्येक वर्गशिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या वयोगटानुसार प्रश्नावली तयार केली होती. पालकांना निमंत्रित करून त्यांच्या समोरच मुलाखती पार पाडण्यात आल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि मुलाखतीला सामोरे जाण्याची तयारी कशी करावी, हे शिकता आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थी आणि पालक दोघेही भारावून गेले. पालकांनी शाळेचे विशेष कौतुक करत लेखी अभिप्रायही दिले. अध्यक्ष सुरेश संकपाळ यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले असून त्यांनी सांगितले की, "अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवतात आणि त्यांना भविष्याच्या दृष्टीने तयार करतात."

उपक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल संकपाळ, सुनील जाधव, महेंद्र बनसोडे, श्रीराम टेके, रामराव जाधव, उज्वला कुंभार, वनिता पवार, डिंपल मॅडम, भाग्यश्री कुंभार आणि राहुल पाटील यांनी विशेष मेहनत घेतली.

मुख्याध्यापक सचिन नलवडे म्हणाले, "शालेय वयातच जर विद्यार्थ्यांना मुलाखतीसारख्या वास्तवाशी संबंधित अनुभव मिळाले, तर ते आत्मविश्वासपूर्वक आपले ध्येय गाठू शकतात."

हा उपक्रम शाळेच्या नवोन्मेषशीलतेचे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या प्रयत्नांचे उदाहरण ठरतो.

3
270 views