logo

स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे म्हसवडचे भूषण – नितिन दोशी


सातारा (म्हसवड ता. माण )(प्रतिनिधी):
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त म्हसवड येथील मोफत नगर वाचनालयात आयोजित विशेष कार्यक्रमात स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी नगराध्यक्ष व नगरवाचनालयाचे अध्यक्ष नितिन दोशी यांनी भूषविले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सागर सरतापे यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.त्यांच्या कार्यकुशलतेचा आणि निष्ठेचा गौरव करताना संपूर्ण म्हसवड शहरासाठी हा क्षण अभिमानाचा ठरला.

या प्रसंगी बोलताना नितिन दोशी म्हणाले, “सागर सरतापे हे अत्यंत कर्तव्यदक्ष व जबाबदार अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहरात स्वच्छतेबाबत सकारात्मक बदल दिसून येतो आहे. आपत्तीच्या काळातही ते कुठलाही आळस न करता आपले कर्तव्य बजावतात. अशा कर्मयोग्याचा सन्मान म्हणजे नगरपरिषदेचाच सन्मान आहे.”

स्वतःच्या सन्मानप्रसंगी बोलताना सागर सरतापे म्हणाले, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी माझा असा सन्मान होणं, हे माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे. हा क्षण मी आयुष्यभर लक्षात ठेवीन. माझं काम म्हणजे केवळ नोकरी नव्हे, तर समाजासाठीची सेवा आहे. भविष्यातही म्हसवड शहर अधिक स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी बनवण्यासाठी मी मनापासून प्रयत्नशील राहीन.”

ते पुढे म्हणाले, “मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अनुयायी आहे. माझ्या हातून कधीही अन्याय होणार नाही, ही माझी जबाबदारी आहे. समाजातील प्रत्येक घटकासाठी समान न्याय आणि सन्मान मिळावा, हीच माझी भूमिका आहे.”

या कार्यक्रमाला शेटे सर, गणेश तावरे, श्री. लोखंडे, माने सर, नामदेव चांडवले, ग्रंथपाल सुनील राऊत तसेच शहरातील अनेक मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन नगरवाचनालयाच्या वतीने करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन ग्रंथपाल सुनील राऊत यांनी केले आणि आभार प्रदर्शन नामदेव चांडवले यांनी केले.

22
3471 views