logo

शिंदखेडा महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे

*शिंदखेडा महाविद्यालयात महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात साजरे*

शिंदखेडा येथील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे कै. शं. दे. पाटील उर्फ बाबुराव दादा साहित्य आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. दि. 11 एप्रिल रोजी क्रांतीसुर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पवार यांच्या शुभ हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या समाज सुधारण्याच्या कार्यावर प्रकाश टाकला. समतेचा दीपस्तंभ विचारांचा क्रांतिकारक आणि आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांनी आपल्या शेतकऱ्यांचा आसूड, सार्वजनिक सत्यधर्म, गुलामगिरी, तृतीय रत्न, ब्राह्मणांचे कसब, अशा विविध साहित्यातून स्त्री शिक्षण, सामाजिक, मानवतावादी विचारांची प्रेरणा केली.
दि. 12 एप्रिल रोजी संविधान जागर या विषयावर रसायनशास्त्र विभागाचे
प्रा. डॉ. एस. एस. पाटोळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. संविधानाविषयी माहिती देताना भारताच्या संविधानाचा मसुदा लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. संविधानाने भारतीयांना प्रगल्भ केले. संविधान हे असे पुस्तक आहे की जे व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत दखल घेते. संविधानातील मूलभूत अधिकार हे मानव जीवनाच्या सर्वोच्च कल्याणासाठी आहेत.तसेच मताधिकार हे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी दिलेले सर्वात मोठे शस्त्र आहे. एवढे अनंत उपकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे या देशातील सर्व जातीधर्माच्या लोकांवर आहेत. जगामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना भारतीय नागरिक म्हणून ओळख मिळवून दिली. असे प्रतिपादन केले.
दि. 14 एप्रिल रोजी महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. पवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच पंचशील वंदना घेण्यात आली. या दिवसाचे औचित्य साधत प्रा. डॉ. आर. के. पवार यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र जीवनाचा आलेख मांडला. आज जगात 150 पेक्षा जास्त देशात बाबासाहेबांची जयंती उत्साहात साजरी होत आहे. ही बाब भारतीय म्हणून खऱ्या अर्थाने गौरवाची अभिमानाची आहे. बाबासाहेबांनी अत्यंत खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. देशात विदेशात जाऊन अनेक भाषांचे अध्ययन केले. भारतीय नागरिकाला आत्मसन्मानाने जीवन जगता यावे म्हणून भारतीय राज्यघटनेच्या अनुषंगाने न्याय, विचार, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, समता, बंधुता धर्मनिरपेक्षता, इत्यादी मूल्य दिली. वर्षानुवर्ष कितपत पडलेल्या स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. बाबासाहेबांनी आपल्या जीवनातून आपल्या कार्यातून विश्वबंधुता ही भावना निर्माण केली. बाबासाहेब सर्वांचे होते असे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. शि. वि. प्रसारक संस्थेचे आदरणीय बाबासाहेब कुणालजी पाटील केंद्रीय कार्यकारिणीचे सन्माननीय संचालक मंडळ तसेच स्थानिक कार्यकारिणीचे अध्यक्ष आदरणीय बापूसाहेब प्रफुल्ल कुमारजी सिसोदे उपाध्यक्ष बापूसाहेब अशोकजी पाटील स्थानिक कार्यकारिणीचे संचालक आदरणीय भाऊसाहेब सुरेशजी देसले सन्माननीय संचालक मंडळ यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. सदर कार्यक्रमास विज्ञान विद्याशाखेचे उपप्राचार्य डॉ. एस. व्ही. बोरसे, कला वाणिज्य विद्या शाखेचे उपप्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एस. टी. राऊळ सर, कार्यालयीन अधीक्षक राहुल पाटील महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्निल गांगुर्डे यांनी केले तर आभार प्राध्यापक एस. बी. सावंत यांनी व्यक्त केले.

19
1334 views