*नाशिकमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी* *नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी घेतले भक्तिभावाने हनुमानाचे दर्शन*
प्रतिनिधी १२ एप्रिल (नाशिक):- नाशिकमध्ये आज हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. नाशिकमध्ये अनेक ठिकाणी हनुमान जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी हनुमान मंदिराच्या बाहेर आकर्षक सजावट करण्यात आली होती. यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला आकर्षक सजावट करून विद्युत रोषणाई केली होती. हनुमानाच्या मंदिराला विद्युत रोषणाई केल्याने मंदिराचे सौंदर्य अधिकच खुलून निघाले होते. अनेक भक्तांनी हनुमान जयंतीच्या शुभेच्छांचे होर्डिंग लावले होते. यामुळे भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. हनुमानाच्या दर्शनासाठी भक्तांनी सकाळपासूनच मंदिरामध्ये रांगा लावल्या होत्या. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. दर्शनासाठी पुरुषांएवढीच महिलांनी, मुलींनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनीही मोठ्या भक्ती भावाने हनुमानाचे दर्शन घेतले. ज्याप्रमाणे हनुमानाने रामाची भक्ती केली त्याप्रमाणे नागरिकांनी देशाची भक्ती करावी असे आवाहन माजी खासदार हेमंत गोडसे यांनी केले. दर्शनासाठी आलेल्या भक्तांसाठी अनेक ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वरण-भात, बुंदी, चपाती, शिरा, भाजी, मोतीचूरचे लाडू अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचा समावेश होता. अनेक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. हनुमानाच्या भक्ती गीतांनी तसेच भक्तांच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून निघाला होता.