
खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या प्रयत्नांना यश : हजारो विद्यार्थ्यांच्या खात्यात
सोलापूर (अकलूज ) प्रतिनिधी :
राज्यातील हजारो हुशार विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) अंतर्गत पात्र विद्यार्थ्यांच्या खात्यात अखेर शिष्यवृत्ती जमा झाली आहे. तब्बल ३८ कोटी रुपये थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आले असून, ३१ हजार विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळाला आहे.
ही प्रक्रिया वेळेवर पूर्ण न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र खा. धैर्यशील मोहिते-पाटील यांनी हा मुद्दा संसदेत शून्य प्रहरात जोरकसपणे मांडला. त्यांनी केंद्र सरकार व संबंधित मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळेच केंद्र सरकारने या प्रकरणात लक्ष घालून निधी वितरित केला.
विद्यार्थ्यांचे पालक व शिक्षक यांनी खा. मोहिते-पाटील यांच्या भूमिकेचे कौतुक करत, त्यांच्या प्रयत्नांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल, अशी भावना व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्याचे शिक्षण आयुक्त राजेश क्षीरसागर यांनी विद्यार्थ्यांना आधार कार्ड व बँक खात्यांचे सीडिंग वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून भविष्यात कोणत्याही अडचणीशिवाय शिष्यवृत्ती वेळेत मिळू शकेल.
ही शिष्यवृत्ती केवळ आर्थिक मदत नाही, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील एक मोठा आधारस्तंभ ठरणार आहे.