logo

पंतप्रधानांच्या नागपूर दौऱ्यासाठी जय्यत तयारी; पण भाजपकडून करण्यात आलेल्या 47 चौकांवरील नियोजनात ऐनवेळी मोठा बदल, नेमकं कारण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नागपूर दौरा निश्चित झाला असून या दौऱ्यात ते ऐतिहासिक दीक्षाभूमीसह रेशीमबागच्या स्मृतिमंदिर येथील डॉ. हेडगेवारांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. देशाच्या इतिहासात प्रथमच पंतप्रधान स्मृती स्थळाच्या दर्शन घेणार आहे. तर संघाच्या शतकपूर्ती वर्षातील 30 मार्च गुडीपाडवाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूरच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी 'माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर'च्या विस्तारीकरणासाठीच्या इमारतीच्या पायाभरणी ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे.

अशातच, पंतप्रधानांच्या सुरक्षेच्या कारणास्तव 47 चौकांवर त्यांच्या स्वागताची भाजपची योजना आता बदलणार असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी पंतप्रधानांचा ताफा जाईल त्यापैकी अनेक रस्ते निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविल्याने भाजपच्या स्वागताच्या नियोजनात बदल होणार आहे. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यासाठी भाजपच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आमदार संदीप जोशी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.

काय म्हणाले स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी?
पंतप्रधानांचा दौरा असल्यामुळे जोरदार सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. सुमारे 5000 पोलीस ठीकठिकाणी बंदोबस्तात तैनात राहणार आहे. पंतप्रधान यांचा ताफा ज्या चौकामधून जाणार आहे, त्यापैकी काही चौक पोलिसांनी निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे भाजपने 47 चौकांवर स्वागताची तयारीचे नियोजन केले होते, मात्र आता त्यात बदल करावे लागणार आहे. कारण पोलिसांनी काही चौक निर्मनुष्य ठेवण्याचे ठरविले आहे. त्यामुळे किती आणि कोणत्या चौकांमध्ये स्वागत करावं, हे पोलिसांच्या निर्णयानंतर ठरेल. ज्या ज्या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वागत होईल, त्या त्या ठिकाणी भगव्या आणि हिरव्या रंगाची म्हणजेच भाजपच्या झेंड्याची थीम स्वागतासाठी वापरली जाणार आहे. गुढीपाडवा असूनही जवळपास 15,000 भाजप कार्यकर्ते ठीकठिकाणी पंतप्रधानांच्या स्वागतासाठी उपस्थित राहतील. अशी माहिती स्वागत समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर इमारतीची पायाभरणी
"माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर"च्या विस्तारीकरणासाठीच्या इमारतीच्या पायाभरणी समारंभासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात येत आहे. नागपूर - हिंगणा रोडवरील "माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर" च्या परिसरात पंतप्रधानांच्या कार्यक्रमासाठी तयारी अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी 5.83 एकर क्षेत्रात माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरचं तब्बल पाच लाख वर्ग फुट बांधकाम असलेली नवीन इमारत उभारली जाणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक संतही उपस्थित राहणार आहे.
-संघ प्रणित माधव नेत्रपेढी 1985 पासून कार्यरत आहे.
-पहिलं रुग्णालय "माधव नेत्रालय सिटी सेंटर"ची सुरुवात हिंदुस्तान कॉलनी मध्ये 2018 मध्ये झाली.
-तर वासुदेव नगर परिसरात "माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर" ची सुरुवात 2022 मध्ये झाली.
-नेत्र रुग्णांसाठी अत्यल्प दरामध्ये अत्याधुनिक नेत्ररोग चिकित्सा दोन्ही रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिली जाते.
-आता "माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर"चा विस्तारीकरण करून मध्य भारतातील सर्वात मोठं आणि आधुनिक नेत्र रोग चिकित्सालय उभारण्याचे नियोजन आहे.
-त्यासाठीच्या नव्या वास्तूच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी सरसंघचालक यांच्यासोबत उपस्थित राहणार आहे.

2
57 views