
यवतमाळच्या आरोग्यसेवेला गंज – हॉस्पिटल परिसर अस्वच्छतेच्या गर्तेत! जबाबदार कोण?
यवतमाळ (दि.27 मार्च): शहराच्या मध्यवर्ती भागातील टिळकवाडी-बापट चौक परिसर हा आरोग्यसेवेचा मुख्य केंद्रबिंदू आहे.येथे अनेक हॉस्पिटल्स,मेडिकल स्टोअर्स,डायग्नोस्टिक लॅब्स,सोनोग्राफी सेंटर आणि आयसीयू युनिट्स कार्यरत आहेत.हजारो रुग्ण उपचारासाठी येथे येतात.मात्र,या भागातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून,तो रुग्णांसाठीच नव्हे,तर संपूर्ण शहरवासीयांसाठी धोकादायक ठरत आहे!
मेडिकल वेस्टेज थेट रस्त्यावर –
कोण घेणार जबाबदारी?
हॉस्पिटल आणि क्लिनिकचा बायोमेडिकल वेस्ट प्लास्टिक पिशव्यांमध्ये भरून रस्त्यावर फेकला जात आहे.परिसरात दुर्गंधी,घाणीचे ढीग आणि डासांचा प्रादुर्भाव वाढत असून,त्यामुळे संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
अग्निसुरक्षा धोक्यात –
पार्किंगच्या समस्येने वाहतूक ठप्प! हॉस्पिटल वेस्टेज जाळण्याचे प्रकार सुरू असून,उन्हाळ्यात अशा घटनांमुळे मोठा अनर्थ होऊ शकतो.नियोजित पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने वाहतूक कोंडी होते.रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना वाहन उभे करण्यासाठी जागा मिळत नाही.हॉस्पिटल प्रशासन आणि नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न दिवसेंदिवस बळावत आहे.
नगरपरिषद आणि प्रशासन कोणती कारवाई करणार?
या परिस्थितीला जबाबदार असलेल्या हॉस्पिटल मालकांवर कठोर कारवाई होणार का? नगरपालिका आणि प्रशासन यावर तातडीने उपाययोजना करणार का? परिसराची स्वच्छता कधी होईल आणि पर्यावरणीय समतोल कधी राखला जाईल?
प्रशासनाने ठोस भूमिका घ्यावी!
हॉस्पिटल प्रशासनाने वैद्यकीय कचऱ्याचे योग्य प्रकारे निस्तारण करणे आवश्यक आहे.नगरपालिकेने कठोर उपाययोजना राबवून दोषींवर कारवाई करावी. नागरिकांनीही सजग राहून प्रशासनावर दबाव टाकला पाहिजे.
युवक काँग्रेसने घेतला पुढाकार –
प्रशासनाला ठोस इशारा!
यवतमाळ जिल्हा युवक काँग्रेसने या गंभीर परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत प्रशासनाला तातडीने कारवाई करण्याची कडक मागणी केली आहे.युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद बगाडे यांनी संताप व्यक्त करत म्हटले की,"हॉस्पिटल परिसरातील अस्वच्छता आणि मेडिकल वेस्टेजमुळे रुग्णांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.केवळ प्रशासनच नव्हे,तर हॉस्पिटल मालक,संचालक,तसेच मेडिकल आणि डायग्नोस्टिक सेंटरचे मालकही यासाठी तितकेच जबाबदार आहेत.वैद्यकीय व्यवसायाचा हेतू केवळ नफा कमावणे नसून,समाजाचे आरोग्य जपणे ही त्यांची नैतिक जबाबदारी आहे.जर त्यांनी स्वतःहून परिसराची स्वच्छता राखण्यास प्राधान्य दिले नाही आणि प्रशासनाने दोषींवर कठोर कारवाई केली नाही, तर युवक काँग्रेस रस्त्यावर उतरेल! हा केवळ इशारा नाही, तर जनतेच्या आरोग्यासाठी लढण्याची आमची कटिबद्धता आहे. प्रशासन आणि जबाबदार व्यक्तींनी आता निद्रिस्त राहू नये, अन्यथा जनता आम्हाला सोबत घेऊन आवाज उठवेल!"