
राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात जिल्हाधिकारी कर्डिले यांच्या ई-ऑफिस प्रणालीला दुसरा क्रमांक
6 लक्ष रुपयांचे राज्यस्तरीय पारितोषिक जाहीर
नांदेड दि. 26 मार्च :- वर्धा येथे जिल्हाधिकारी असताना राहुल कर्डिले यांनी संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात राबविलेल्या ई - ऑफिस प्रणालीची दखल राज्य शासनाने घेतली आहे. २०२४-२५ च्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानात या उल्लेखनीय कार्याला पुरस्कृत करण्यात आले असून राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार त्यांना मिळाला आहे.
नवीन तंत्रज्ञानामुळे प्रशासनाच्या कामात नवनवीन बदल करणे आवश्यक ठरते. वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी वर्धा कार्यालयात ई-ऑफिस प्रणाली सन 2023-24 मध्ये यशस्वीरित्या राबविली. यामुळे प्रशासकीय कामकाजात सुलभता आली. या उल्लेखनिय कार्याची दखल घेवून राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान 2023-24 स्पर्धेत वर्ध्याचे तत्कालिन जिल्हाधिकारी व आताचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या कार्य कर्तृत्वाला द्वितीय पारितोषिक जाहिर झाले आहे. विभागीय स्तरावरील निवड समित्यांकडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. वर्धा जिल्ह्याच्या तालुकास्तरावर देखील त्यांनी ई -ऑफिस प्रणाली सुरू केली होती. त्यामुळे फायलींचा पसारा कमी करण्यात मदत झाली. नांदेडमध्येही त्यांनी या अभियानाला सुरुवात केली आहे.
संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील महसूल विभागात ई-ऑफिस प्रणाली राबविण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना 6 लक्ष रुपयांचे द्वितीय राज्यस्तरीय पारितोषिक शासनाच्यावतीने जाहीर झाले आहे. महसूली विभागातील बदलत्या नवीन तंत्रज्ञानामुळे व जागतिकरणामुळे प्रशासनाच्यामध्ये मोठया प्रमाणात बदल करणे आवश्यक असते. त्यानुसार प्रशासनातील सेवांच्या गुणवत्तेत वाढ, लोकाभिमुखता व निर्णयशिलता आणण्यासाठी तसेच सर्वाच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान व स्पर्धा आयोजित केली जाते.
या गटात अवैध गौन खनिज उत्पादन आणि वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्याकरिता केलेल्या प्रयोगासाठी अहिल्यानगरला प्रथम पुरस्कार. तर नगर परिषद कार्यालयाकरिता सोलार प्रकल्प कार्यान्वित केल्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील निलंगा नगर परिषदेला तृतीय पुरस्कार मिळाला आहे.