
वारसा खाद्य संस्कृतीचा कार्यक्रमाचे दिमाखदार उद्घाटन
पाककला स्पर्धेसाठी महिलांचा उदंड प्रतिसाद ; आजीबाईचा स्वयंपाकघराने जिंकले उपस्थितांची मने
नांदेड ता.२६ _ महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीला उजाळा देणाऱ्या दोन दिवसीय कार्यक्रमाला बुधवारी (ता. २६) अंबिका मंगल कार्यालय, मोर चौक नांदेड येथे सुरुवात झाली. महिलांसाठी भव्य पाककला स्पर्धा, चर्चासत्रे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि चविष्ट फूड स्टॉल्सच्या माध्यमातून हा उत्सव रंगतदार होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग व सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांच्या वतीने आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे व सांस्कृतिक कार्य संचालनालय संचालक विभिषण चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
महिलांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत विजेत्यांसाठी प्रथम पारितोषिक तीन हजार रुपये, द्वितीय पारितोषिक दोन हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक एक हजार रुपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रीयन पारंपारिक खाद्य पदार्थांची स्पर्धा आयोजित करण्यात आली. स्पर्धकांनी घरी तयार केलेले पदार्थ सादर केले. कार्यक्रमात सकाळी १०:३० वाजता उद्घाटन झाले. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत चर्चासत्रांना सुरुवात झाली. डॉ. जया बंगाळे (प्राचार्य, सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, परभणी) यांनी ‘सण उत्सवांशी जोडलेली खाद्यसंस्कृती’ या विषयावर आपले विचार मांडले. त्यानंतर डॉ. प्रज्ञा धुतमल (सहाय्यक प्राध्यापक, फूड टेक्नॉलॉजी, ग्रामीण कॉलेज, नांदेड) यांनी ‘पारंपरिक खाद्य पदार्थात तेल व गुळाचा उपयोग व परिणाम’ यावर व्याख्यान दिले. दुपारच्या सत्रात प्राध्यापक डॉ. रंगनाथ नवघडे (विभाग प्रमुख, कुसुमताई चव्हाण अध्यापक महाविद्यालय, नांदेड) यांनी ‘खाद्यसंस्कृतीची आपली पारसबाग’ या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. त्यानंतर प्राध्यापक डॉ. प्रशांत शेगावकर (विभाग प्रमुख, आयटीएम कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, नांदेड) यांनी ‘पाश्चात्य खाद्यपदार्थांचे अतिक्रम’ या विषयावर विचार मांडले. सायंकाळी अमित घरात आणि त्यांचे सहकारी (मुंबई) यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे विशेष सादरीकरण केले. गुरुवारी (ता. २७) सुद्धा हा कार्यक्रम नागरिकांसाठी खुला असणार आहे. कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून केले आहे.
-----------------चौकट---------------
आजीबाईचे स्वयंपाकघर ठरतेय लक्षवेधी
महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृती कार्यक्रमात आजीबाईंच्या स्वयंपाकघराचा पारंपरिक देखावा उभारण्यात आला आहे. जुन्या काळातील ग्रामीण जीवनशैली आणि स्वयंपाकघरातील वस्तूंचे दर्शन घडवणारा हा आकर्षक उपक्रम उपस्थितांचे लक्ष वेधून घेत आहे. स्वयंपाकघरात सुप, पाटा-वरवंटा, खलबत्ता, दगड तळी, तांब्याची भांडी, घागरी, चूल, माठ, दध्याचा माठ, लॅम्प, पातेली यांसारखी पारंपरिक भांडी ठेवण्यात आली आहेत. यामध्ये आजीबाई कशाप्रकारे घरगुती कामे करायच्या, याची झलक मिळते. साधेपणा आणि टिकाऊपणा दर्शवणाऱ्या या वस्तू जुन्या काळातील स्वयंपाकघराच्या आठवणी जाग्या करतात.कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांनी या पारंपरिक देखाव्याचा मनमुराद आनंद घेतला. अशा प्रकारे खाद्यसंस्कृतीच्या माध्यमातून महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जपण्याचा प्रयत्न करण्यात आला.