
उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत नवसाक्षरांची उत्साहात परीक्षा
पिंपळगाव सराई, दि. २३ मार्च २०२५ – साक्षरतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, उल्हास नवभारत साक्षरता अभियान अंतर्गत जनता विद्यालय, पिंपळगाव सराई येथे नवसाक्षरांसाठी विशेष परीक्षा आयोजित करण्यात आली. शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात प्रौढांना सामील करून घेण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या परीक्षेत अकरा नवसाक्षरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.त्यांची ॲप वर नोंदणी करून गेल्या सहा महिन्यांपासून विद्यालयातील शिक्षक यांनी आपले शैक्षणिक कार्य सांभाळून त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले होते.
या परीक्षेचा विषय "पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान" हा होता. परीक्षेच्या माध्यमातून नवसाक्षरांचे लेखन, वाचन व मूलभूत गणित कौशल्ये तपासली गेली. परीक्षेसाठी संपूर्ण नियोजन अत्यंत काटेकोरपणे करण्यात आले होते.
या परीक्षेचे केंद्र संचालक म्हणून प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. परीक्षेच्या सुयोग्य पर्यवेक्षणाची जबाबदारी रवींद्र खांनंदे यांनी पार पाडली, तर परीक्षक म्हणून सुदाम चंद्रे यांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यमापन केले.
प्रशासनिक बाजू सक्षमपणे हाताळण्यासाठी अजय सोळंकी (लिपिक) आणि पंजाबराव गायकवाड (कर्मचारी) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सौ. वंदना लकडे व गजानन पाटोळे यांनी परीक्षेच्या आयोजनात विशेष सहकार्य केले.
ही परीक्षा नवसाक्षरांसाठी केवळ एक औपचारिकता नसून त्यांच्या ज्ञानार्जनाचा आणि आत्मविश्वास वाढवण्याचा महत्त्वाचा टप्पा ठरली. परीक्षेला आलेल्या नवसाक्षरांनी अभिमानाने आपली लेखन आणि गणन कौशल्ये दाखवली.
उल्हास नवभारत साक्षरता अभियान हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० अन्वये राबवले जाणारे महत्त्वाकांक्षी अभियान आहे. २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविला जात असून १५ वर्षे आणि त्यावरील प्रौढांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हा यामागील मुख्य उद्देश आहे.
ही परीक्षा म्हणजे केवळ एक पाऊल असून, अशा उपक्रमांमुळे नवसाक्षरांच्या जीवनात शिक्षणाची नवी उमेद निर्माण होत आहे. या प्रयत्नांमुळे पिंपळगाव सराईसह संपूर्ण समाज अधिक साक्षर आणि प्रगत होईल, असा विश्वास या उपक्रमाशी संबंधित सर्व शिक्षक व सहकाऱ्यांनी व्यक्त केला.