
सावनेर परिसरातील अंदाजे 50. 55% जनतेला तंबाखूजन्य पदार्थाचे व्यसन
नागपूर जिल्हा
प्रतिनिधी चंदू मडावी :
सावनेर कळमेश्वर :
मिळालेल्या माहितीनुसार
"सावनेर तालुक्यातील अंदाजे 50-55 टक्के जनता तंबाखू, गुटखा, धूम्रपान अशा व्यसनांच्या आहारी गेल्याचे दिसत असून कर्करोगाच्या दृष्टीने ही गंभीर बाब आहे. कुटुंबातील एखादा व्यक्ती व्यसनाच्या आहारी गेल्यास त्याला फक्त शारीरिकच नव्हे तर त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आर्थिक, सामाजिक व मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात व्यसनाचे प्रमाण जास्त आहे. प्रारंभिक अवस्थेत कॅन्सरचे निदान तसेच कॅन्सरबद्दल जनजागृती हाच त्यावर सर्वोत्तम उपाय आहे. आधुनिक उपचार पद्धतीमुळे प्रारंभिक अवस्थेतील कॅन्सरवर मात करणे शक्य आहे. तेव्हा युवक, महिला व ज्येष्ठांनी सुद्धा आपली तपासणी करून घ्यावी", असे प्रतिपादन आमदार डॉ आशिषराव देशमुख यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र केळवद येथे 24 मार्चला आयोजित कर्करोग निदान व उपचार शिबिरात केले.
आमदार डॉ आशिषराव देशमुख आयोजित कॅन्सरमुक्त अभियानांतर्गत केळवद येथील शिबिरात विविध विभागातील 435 कर्करोग संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. कर्करोगाची स्पष्ट लक्षणे आढळलेल्या 112 रुग्णांना पुढील उपचारासाठी रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, हिंगणा रोड, नागपूर, लता मंगेशकर हॉस्पीटल, हिंगणा रोड, नागपूर व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (रुग्णालय) येथे रेफर करण्यात आले आहे. यावेळी कर्करोग व क्षयरोग जनजागृतीची शपथ सर्वांना देण्यात आली.
रणजीत देशमुख दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ अभय कोलते यांनी यावेळी मोलाचे मार्गदर्शन केले.
लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूरच्या कर्करोग, स्त्रीरोग, शल्यचिकित्सा, कान/नाक/घसा, मेडिसिन, बालरोग, त्वचारोग, अस्थिरोग व दंतरोग विभागातील विशेषज्ञांनी या शिबिरात आपल्या सेवा प्रदान केल्या.
यावेळी भाजपाचे मनोहर कुंभारे, रामराव मोवाडे, दिगंबर सुरटकर, डॉ विनय हजारे, सावनेरच्या तालुका आरोग्य अधिकारी डॉ किरण जाधव, प्राथमिक आरोग्य केंद्र केळवदच्या डॉ चेतना उमाटे, डॉ मीनल कुलकर्णी, डॉ यामिनी पुसदेकर, डॉ अनुप्रिता भडागे, डॉ सुधीर रावलानी तसेच रणजीत देशमुख दंत महाविद्यालय, एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर्स तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढील कर्करोग निदान व उपचार शिबिर तसेच इतर सर्व प्रकारच्या रुग्णांचे तपासणी शिबीर 29 मार्चला प्राथमिक आरोग्य केंद्र गोंडखैरी येथे संपन्न होईल.