
जनता विद्यालयात जल दिन विविध उपक्रमांनी साजरा
पिंपळगाव सराई, (प्रतिनिधी) :
जागतिक जल दिनानिमित्त जनता विद्यालयात पर्यावरण विभाग व ‘इको क्लब’च्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन करून जल संवर्धनाचा संदेश देण्यात आला. ‘जल हैं तो कल हैं! नहीं तो यहीं आखरी पल हैं!’ असा संदेश देत प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी जल संरक्षणाची निकड अधोरेखित केली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते, तर प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून जि.प. बुलडाणा येथील पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता व विद्यालयाचे माजी विद्यार्थी स्वप्नील खंडारे उपस्थित होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक भगवान आरसोडे, शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने झाली. गावातून निघालेल्या विद्यार्थ्यांच्या घोषणांनी जल संवर्धनाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचवले. जल हीच जीवनरेषा आहे, याची जाणीव फेरीद्वारे गावकऱ्यांना करून देण्यात आली.
यानंतर विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात स्वप्नील खंडारे यांनी शासनाच्या विविध जलसंधारण योजनांची माहिती दिली. ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जल व्यवस्थापनाचे महत्त्व त्यांनी उदाहरणांसह मांडले. प्राचार्य ठोंबरे यांनी पाण्याची सध्याची स्थिती, भविष्यातील संकटे आणि जल संवर्धनासाठी प्रत्येक व्यक्तीने उचलायची जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन पाटोळे यांनी केले. नियोजन व संचालन इको क्लबचे प्रमुख देविदास दळवी यांनी तर आभार प्रदर्शन अविनाश असोलकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विद्यालयाच्या सर्व घटकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या उपक्रमांद्वारे विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये पाणी वाचविण्याची सवय लागावी, जल संवर्धनाबद्दल जागृती निर्माण व्हावी आणि भावी पिढ्यांसाठी जलसंपत्ती टिकून राहावी, असा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.