logo

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेसह १७ जणांचा प्रितम म्हात्रे यांच्याहस्ते उलवेरत्न गौरव

यमुना सामाजिक शैक्षणिक संस्थेसह १७ जणांचा प्रितम म्हात्रे यांच्याहस्ते उलवेरत्न गौरव

त्रिवार्षिक उलवेरत्न पुरस्कार सोहळ्याला उलवेकरांची अलोट गर्दी

आम्ही उलवेकर सामाजिक संस्थेचा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी - प्रितम म्हात्रे

पनवेल : राज भंडारी

आम्ही उलवेकर मित्र मंडळ उलवे यांच्यावतीने दिला जाणारा त्रिवार्षिक उलवेरत्न पुरस्कार शनिवारी शेकापचे खजिनदार तथा पनवेल मनपाचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम जे. एम. म्हात्रे, काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, गव्हाण ग्रामपंचायत सरपंच माईताई भोईर यांच्या प्रमुख उपस्थितीत उलवेतील सेक्टर १७ येथील मैदानावर पार पडला. यावेळी समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांच्या १७ रत्नांचा गौरव करण्यात आला असून आम्ही उलवेकर मित्र मंडळाच्यावतीने संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे - येरुणकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आला. तीन वर्षातून एकदा आयोजन करण्यात येत असलेल्या या उलवेरत्न पुरस्कार सोहळ्याचे हे दुसरे पर्व मोठ्या दिमाखदार पद्धतीने पार पडले.

आम्ही उलवेकर मित्र मंडळाच्या वतीने समजपयोगी कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. यावेळी साहिल पाटील प्रस्तुत ज्योती प्रोडक्शन अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या वतीने सुरेख अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये भक्तीगीते, गवळण, श्रीमंत छत्रपती शिवरायांच्या सहसाचे दर्शन घडविणारा पोवाडा आणि लावणीचे बहारदार गायन तसेच नृत्य सादर करून उलवेकरांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची मेजवानी देण्यात आली.

आम्ही उलवेकर मित्र मंडळ हे गेली अनेक वर्षे सातत्याने उलवे परिसरात सामाजिक उपक्रम राबवित असताना सर्वसामान्य जनतेला भेडसावणाऱ्या प्रशांना देखील वाचा फोडत असते. यामध्ये उलवे परिसरातील नागरिकांच्या गैरसोयी दूर करण्यासह महिलांसाठी विविध उपक्रम राबविणे तसेच शिवजयंती, गुढीपाडवा, होळी, दहीहंडी आदि सण देखील याठिकाणी एकत्रितरित्या राबविण्याचे उपक्रम या मंडळाच्या वतीने करण्यात येत असतात. याचाच एक भाग म्हणून कोरोना काळात आम्ही उलवेकर मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष सचिन राजे येरुणकर यांनी त्रिवार्षिक उलवेरत्न पुरस्कार देण्याची प्रथा सुरु केली. या पुरस्कार सोहळ्यामध्ये कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या रत्नांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे हे दुसरे पर्व असून यावर्षीचा हा पुरस्कार सोहळा अधिक दर्जेदार पद्धतीने साजरा केला गेला.

या पुरस्कार सोहळ्यामध्ये एकूण १७ रत्नांचा शोध घेऊन त्यांना गौरविण्यात आले. यामध्ये कवी आणि घोषवाक्य डिझायनर कुणाल उत्तम वारुळे, लेखिका मनीषा अश्विन पोखरकर, व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका तथा समाजसेविका मनीषा वसंत वाळकुंडे, कराटे या खेळात प्राविण्य मिळावीणारा ओमकार चिदंबरम अय्यर, परिसरातील महत्वपूर्ण बाबी जगभरात नेणारा युट्युबर स्वप्निल गाडगे, उद्योजिका अंकिता वानेश गोंधळी, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर साईशा राऊत, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आणि इंडियन वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर सिद्धार्थ दास, अभिनेता महेंद्र तांडेल, गायक यज्ञिक साईनाथ मोकळ, समाजसेविका निकिता निलेश खारकर, समाजसेवक वितेश म्हात्रे, बेसबॉलपट्टू तनवी गणेश इंगळे, ॲथलेटिकमध्ये सुवर्ण कामगिरी करणारा रचित संदीप पाटील, क्रिकेट या खेळाचे उत्तम सादरीकरण करून रायगड जिल्ह्यात अव्वल राहणारा संघ जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामण डोंगरी, सामाजिक संघटना संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा सेवा ट्रस्ट आणि अनेक सेवाभावी संस्थांना, गोरगरिबांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असणारी संस्था म्हणजेच यमुना सामाजिक शैक्षणिक संस्था शेलघर यांचा उलवेरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

5
702 views