logo

*स्वराज्यद्रोही नितेश राणे मावळ्यांच्या जातींवरून योगदान नाकारणार का?*

नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात अजब आत्मविश्वासाने एक थाप मारली की "शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम वगैरे नव्हते!"
असे वक्तव्य करण्यातून महाराजांचा उज्वल इतिहास जो सर्व जाती धर्मांच्या एकोप्याचा आहे तो नाकारायचे विकृत कार्य राणे यांनी केले आहे. यांतून महाराजांना समाज तोडण्याचे प्रतिक बनवून त्यांची प्रतिमा मलीनच होणार आहे आणि याची अशा थापेबाज अडाणी नेत्यांना बिलकुल चिंता नसते. तुम्ही थापा मारा,आम्ही सत्य मांडत राहू आणि पुराव्यासकट...

राणे साहेबांना न रुचणारा इतिहास सांगतो..
शिवकालीन समाजात "गावचा पिरा" हा सर्व धर्मियांचे ग्राम-दैवत असायचा. त्यावर सर्वांचीच श्रद्धा असायची, तशी ती शहाजी राजेंच्या वडिल(मालोजी) आणि आई(दीपाबाई) यांची सुद्धा होती. मालोजी यांनी पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून अहमदनगर जवळ "शहाशरीफ" पीर यांच्याजवळ नवस केला होता. शके १५१६ रोजी शहाजी राजेंचा जन्म झाला आणि वर्षभराने दुसरे पुत्र शरीफजीराजे यांचा जन्म झाला. नवस पूर्ण झाला म्हणून पिराच्या नावावरूनच दोन्ही पुत्रांची नावे दिली गेली. इतकेच नव्हे मालोजीराजे भोसले यांनी सुलतान बुराण निजामशाह याच्याकडून पिरास नवसाबद्दल एक गाव आपल्या नावे इनाम करून दिले. ही माहिती शेडगावकर बखरीमध्ये आली आहे. इतकेच नव्हे, शिवछत्रपतींच्या हयातीत लिहिलेल्या 'शिवभारत:द.वा.पोतदार संपादित' बखरीमध्ये सुद्धा 'शहा व शरीफ ही नावे सिद्ध पुरुषाच्या नावावरून दिली' अशी माहिती आली आहे. खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या वडिलांच्या नावाबाबत जरा सुद्धा तिटकारा नव्हता. शिवकाळात सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांचा आदर व्हायचा हेच यांवरून दिसते. मात्र राणेंना हा इतिहास झोंबणार हे नक्की.
राणेंच्याच कोकणात 'केळशी' या गावी "संत याकुत बाबा" यांची दर्गा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज गेल्याचे आणि दर्गाचे जीर्णोद्धार केल्याचे इतिहासकार गो.स.सरदेसाई यांनी 'New History of Marathas Vol.1' या पुस्तकामध्ये लिहिले आहे. इतकेच काय.. १९ ऑक्टोबर १६८० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी बाबा याकुत यांच्या स्थापनेनंतर शंभूराजे सुद्धा दर्शनास गेले आणि २५ऑक्टोबर रोजी रायगडास गेले अशी माहिती डॉ. कमल गोखले यांनी दिली आहे. कमल गोखले यांच्या माहितीला असाधारण महत्व आहे कारण शंभूराजेंच्या इतिहासावर त्यांनी PhD केली आहे. राणेंनी या दर्गाला एकदा भेट द्यावी.

'शिवाजी महाराजांच्या सैन्यात काही मुस्लिम बिस्लिम नव्हते' असे म्हणताना मनात थोडी शरम वाटली असणार, परंतु चेहऱ्यावर ती न दाखवता राणे बोलून गेले हे त्यांचे कसब आहे.
कोकणाचा प्रांत जंजिऱ्याच्या सिद्दी, गोव्याच्या पोर्तुगीजांकडून सुरक्षित ठेवायचा असेल तर आपले सागरी आरमार असले पाहिजे हे महाराजांनी ओळखले होते. महाराजांनी त्यावेळी "दौलत खान आणि दर्यासारंग" या मुस्लिम मावळ्यांवर नौदलाची जबाबदारी दिली होती. सुरेंद्रनाथ सेन यांच्या Administrative system of the marathas या ग्रंथात ही माहिती दिली आहे. महाराजांचे मंत्री कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये दौलत खान आणि दर्यासारंग यांची नावे आरमार अधिकारी म्हणून दिली आहेत. शिवकालीन पत्रांमध्ये दोघांच्या सागरी मोहिमांचा उल्लेख आहे.
सिद्दी इब्राहिम याचे नाव तर अनेक लोकांनी ऐकले आहे. या वीराला इतिहासात वेगळे स्थान आहे. प्रसिद्ध अफजलखान वध झाला त्या वेळी महाराजांनी सोबत जे अंगरक्षक प्रतापगड येथे नेले त्यामध्ये सिद्दी इब्राहिम होता. महाराजांचा कवी परमानंद याने लिहिलेल्या शिवभारत ग्रंथातच ही माहिती नमूद आहे. "शिवभारत:अध्याय २१ मध्ये श्लोक ७०-७३" मध्ये सिद्दी इब्राहिम याच्या शौर्याचा उल्लेख आला आहे. श्लोक ७९,८० मध्ये परमानंदाने लिहिले आहे की सिद्दी इब्राहिमने अफजलचे बरेच सैनिक मारले. आता या वीराचा पराक्रम नाकारणारे मूर्खच म्हणावे लागतील.
औरंगजेबने आग्रा येथे शिवाजी महाराजांना कैद केले त्यानंतर सुटकेवेळी महाराजांच्या मागे हिरोजी फर्जंद आणि मदारशाह मेहतर थांबले. 'शिवचरित्र निबंधावली' या आणि अनेक ग्रंथात मदारी मेहतर यांचे उल्लेख आहेत. जीवाची पर्वा न करता हे लोक महाराजांसाठी मरायला तयार होते. अशा मावळ्यांचे योगदान नाकारणार का?
इब्राहिम खान यांची तोफखाना प्रमुखपदी महाराजांनी नियुक्ती केली. फोंड्याचा किल्ला जिंकताना इब्राहिम खान याच्या तोफखान्याने बुरुज फोडून गड जिंकला होता. Military system of marathas या ग्रंथात इब्राहिम खान यांचे नाव खोडदळ, पायदळ अधिकारी म्हणून सभासद बखरीत आले असल्याचे प्रसिद्ध इतिहास संशोधक सुरेंद्रनाथ सेन सांगतात.
सिद्दी मिस्री याच्या सेवेबाबत सुद्धा सेन यांनी माहिती दिली आहे. सिद्दी संबल आणि सिद्दी मिस्री हे मुस्लिम नौदल अधिकारी १६७६ पासून मराठ्यांच्या सेवेत होता ज्याने संभाजीराजेंच्या आरमारी मोहिमांमध्ये सुद्धा योगदान दिले आहे(Shivaji the great- Bal krishna).

सिद्दी हिलाल नामक मुस्लिम सैनिक जो खेलोजी भोसले यांचा कृतपुत्र होता. त्याने शिवरायांची बरेच वर्ष सेवा केली. सिद्दी हिलाल यांचे नाव विसरता येणार नाही कारण सन १६६० मध्ये सिद्दी जोहरच्या पन्हाळा वेढ्यात शिवाजी महाराज अडकले तेव्हा महाराजांच्या सुटकेसाठी सिद्दी हिलाल आणि त्यांचे पुत्र त्वेषाने लढले होते. शिवभारत मध्ये परमानंद म्हणतो "प्रलयाग्नी समान हिलाल हा भोसल्यांचा हितकारी आहे!"(अध्याय२४, श्लोक३६).
सिद्दी हिलाल यांचा शूर पुत्र सिद्दी वाहवाह हा याच लढाईमध्ये वीरगतीस प्राप्त झाला. शिवभारत(अध्याय२६, श्लोक ३३-३६) मध्ये अशी नोंद आहे की, "हिलालचा क्रोधी आणि सामर्थ्यशाली पुत्र वाहवाह शत्रूव्यूहात घुसला. शत्रूंची छाती फाडणारा तो शूर युवा आपली चपळता दाखवणारा अत्यंत दर्शनीय वाटत होता!" हा शूर मावळा सिद्दी जोहर सैन्याच्या भाल्यांनी जखमी होऊन घोड्यावरून पडला आणि त्याला ओढत नेऊन ठार केले गेले.
या व्यतिरिक्त रायगडाचे मुंशी काजी हैदर, नूरखान बेग, बहिलीम खान, शंभूराजेंचे सैनिक कावजी महंमद, जागोजी फर्जंद आणि यांच्या अधिकारात असणारे हजारो मुस्लिम सैनिक यांचे योगदान इतिहासात नमूद आहे ते बदलता येणार नाही.

या मावळ्यांनी आपले रक्त, प्राण मराठी मातीसाठी अर्पण केले. अनेकांनी बलिदान दिले. जीव घेतले आणि जीव गमावले सुद्धा. सर्व काही एका गोष्टीसाठी.. ती म्हणजे स्वराज्य! महाराजांचे मावळे महाराजांसाठी आणि स्वराज्यासाठी बलिदान देण्यास तयार असत.. आजचे या पक्षावरून त्या पक्षावर माकड उड्या मारणारे आणि ED,CBI ला घाबरून आपले व्यवसाय संभाळणारे नेते त्या बलिदानाची जाण काय राखणार?
भविष्यात जाण झालीच तर मनोमन या मावळ्यांची माफी मागून घ्या.
आपल्या मनातील द्वेषासाठी आपल्या स्वतःच्या घराण्याचा वापर करा. सबंध बहुजनांच्या आदर्शाना विकृत बनवून सादर करू नका.
*जय शिवराय। जय महाराष्ट्र।*

60
5530 views