logo

०३ मार्च जागतिक वन्यजीव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा . . बिबट्याचे अनावृत पत्र ......

प्रिय माणसा ,
मी जंगलातील माझ्या सवंगड्यांचा विचार करतो तेव्हा , या प्राण्यांना व पक्ष्यांना बोलता आले तर मनुष्यप्राण्याचे वर्णन कसे काय करतील ? त्यांना मनुष्य प्राण्याबद्दल काय वाटत असेल ? मला नाही वाटत की त्यांचे मत माणसांबद्दल चांगले असेल . तुमची संस्कृती आणि सुधारणा जमेस धरल्या तरीही मानव जंगली राहिला आहे . एवढेच काय , पण तो आम्हा जंगली पशूंपेक्षा जास्त धोकादायक आहे ! आमचे आयुष्यच संघर्षाने भरलेले आहे . जे बलवान आहेत , ते कमजोरांवर उपजीविका करतात आणि जे कमजोर आहेत ते स्वतःचे रक्षण करण्याकरिता पर्यावरणाशी मिसळून जातात . परंतु हा जंगलाचा कायदा प्रामुख्याने भूक भागविण्याकरिताच अमलात येतो . मनुष्य मनुष्याला खात नाही , पण तो त्याला इतर कारणांकरिताच मारतो . तो जरी खरोखरच देहाने त्याला ठार मारीत नसला तरी त्यांच्या भावनांची कदर न करता ठार मारीतच असतो . मानवता बऱ्या - वाईटांचे , सुधारणा तसेच जंगलीपणा , पवित्र तसेच अगदी हीन वृत्ती यांचे चमत्कारिक मिश्रण आहे . इतर कुठल्याही देशांपेक्षा भारतात वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबद्दल जुन्या ग्रंथांतून लिहिले गेले आहे . अगदी क्षुद्रातील क्षुद्र किंवा अगदी धोकेबाज प्राण्यांचादेखील नाश करण्यास येथील लोक धजावत नाहीत . परंतु प्रत्यक्षात मात्र वन्यजीवनाकडे फारच दुर्लक्ष केलेले आहे . तुमच्या वाढत्या लोकसंख्येमुळे प्रथम गदा आली तर ती माझ्या साम्राज्यावर . शेतीसाठी अधिक जमीन मिळवण्याकरीता तुम्ही जंगलांवर अतिक्रमणे केलीत . मानवी हस्तक्षेपामुळे वारंवार लागणारे वणवे , शहरीकरणाकरिता संकुचित होणारी जंगले , चाऱ्याचे अनिर्बंध निष्कासन , माझ्या भक्ष्यांची मानवाकडून होणारी शिकार , वृक्षतोडीमुळे कमी झालेले पाण्याचे प्रमाण , यामुळे या सर्वांवर अवलंबून असणारे वन्यजीव नामशेष होऊ लागले .

आम्ही मार्जार कुळातले प्राणी आहोत . जगामध्ये छोट्या व मोठ्या मांजरांच्या बऱ्याच प्रजाती आहेत . आपल्या भारतात तर मांजरांच्या १५ विविध प्रजाती व ८ उपप्रजाती अस्तित्वात होत्या . आज यातील उपप्रजाती नामशेष झाल्या आहेत . तर उरलेल्या ५ पैकी ३ नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत . आम्ही बिबळे मात्र अडचणींवर मात करुन अजूनही तग धरुन बसलो आहोत .

आपल्याला वर्तमानपत्रत वाचायला मिळते की , आमचे वनक्षेत्र कमी होऊन आमचे भक्ष्य आणि पाण्याच्या दुर्भिक्षामुळे आम्ही मनुष्यवस्तीकडे येऊ लागलो आहोत व माणसांना आपले भक्ष्य करु लागलो आहोत . तुम्ही मानव मुळात आमचे खाद्य नाही . त्यामुळे आम्ही तुमच्यावर उगाच आक्रमण कधीच करत नाही . पण जेव्हा आम्हास तसेच बछड्यांना तुमच्यापासून धोका आहे असे आम्हाला वाटते तेव्हाच आम्ही तुमच्यावर हल्ला करतो . " तुम्ही काय केले असते अशा वेळी ? तेच आम्ही करतो . मग आम्ही गुन्हेगार कसे ? कोणी आणली आमच्यावर ही वेळ ? तुम्हीच ना . . . . . ? " तुम्हीच आमच्या जागेवर अतिक्रमण केलेत . तुमच्या क्षुद्र स्वार्थासाठी आमच्या हत्या केल्यात . आम्हाला आमच्याच हद्दीतून हाकलवण्यासाठी जंगले पेटवलीत . तुमच्या भूमीवर कोणी आक्रमण केले तर तुम्ही काय करता ? केल्यात ना मोठमोठ्या संख्येने हत्या ? तुमच्या मानवी भाषेत याला तुम्ही लढाया , युद्धे म्हणता . तुमच्यावर आक्रमण करणाऱ्यांच्या तुम्ही हत्या करता . त्या हत्या करणाऱ्यांचा तुम्ही सत्कार करता . सन्मान करता , पदके देऊन " गौरव " करता . मग आम्ही ही तेच केले ? पण आम्हास मात्र दूषणे देता . आमचे पारिपत्य करण्याच्या योजना आखता . असा दुहेरी न्याय का ? अर्थात तुम्ही मानवांनी नेहमीच असे केले आहे . तुम्ही हजारोंनी माणसे मारायची आणि आम्ही आमच्या संरक्षणासाठी व अगदी काहीच मिळाले नाही तर भुकेपोटी एखादी तुमची शेळी , कोंबडी किंवा कुत्रा पळवला तर आम्ही चोर ! यदाकदाचित काहीच नाही मिळाले तर . . . . . लगेच आम्ही तुमच्या रक्ताला म्हणे चाललेले गुन्हेगार !

मानवा , अरे , थोडा विचार कर , आमचे अस्तित्व जर संपले तर काय राहील मागे ? केवळ सिमेंटची जंगले आणि तीच तुमच्याही अस्तित्वाची मृत्यु घंटाच असेल . तेव्हा सावध हो . आपण परस्परांच्या अस्तित्वाचा सन्मान करु या आणि सृष्टीला सदाबहार ठेवू या .

तुमचा हितैषी ,
संजय बिबट्या .

श्री . वैभव पद्माकर कुलकर्णी

निसर्ग विज्ञान संस्था , डोंबिवली .

स्वयंसेवक : - वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो ,
केंद्रीय पर्यावरण मंत्रालय ,
भारत सरकार , न्यू दिल्ली .

141
5056 views