
विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा स्नेहबंधतर्फे गौरव
अहिल्यानगर :शहाजी दिघे
अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन केला सत्कार
अहिल्यानगर - गुणवत्तापूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांचा स्नेहबंधच्या वतीने संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी गौरव केला.
राष्ट्रपती पदक स्वीकारल्यानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे हे नुकतेच नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते. या निमित्त त्यांचा डॉ. उद्धव शिंदे यांनी सन्मानपत्र व तुळशीचे रोप देऊन गौरव केला. यावेळी पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपस्थित होते.
डॉ. शिंदे म्हणाले, विशेष पोलीस महानिरीक्षक कराळे यांनी सांगलीत महापालिका शाळेतून प्राथमिक शिक्षण घेऊन साताऱ्यातील सैनिक स्कूलमधून आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी रसायनशास्त्रात बीएस्सी पदवी मिळवली. चंद्रपूरमधील नक्षलग्रस्त भागातून त्यांनी पोलीस उपअधीक्षक म्हणून कर्तव्य बजावले, तसेच युनोमध्ये युगोस्लाव्हिया, कोसोवा येथे आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून काम केले. ते मुंबईमध्ये सहा वर्षे पोलीस उपायुक्त होते. तसेच नाशिक शहर, कल्याण, ठाणे, धाराशिव या ठिकाणी त्यांनी पोलीस उपायुक्त तसेच पोलीस अधीक्षक म्हणून सेवा बजावली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, दहशतवाद विरोधी पथक, पूर्व प्रादेशिक अधिकारी, पोलीस सहआयुक्त म्हणूनही त्यांनी सेवा दिली आहे. २०१३ मध्ये त्यांना राष्ट्रपती पदक प्राप्त झाले होते. तसेच युनो शांती, आंतरराष्ट्रीय सेवा पदक, विशेष सेवा पदक, पोलीस महासंचालक यांचे सन्मान चिन्ह प्राप्त झाले आहे.