
श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोलारा येथे मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात...........
श्री सिद्धेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोलारा येथे आज दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोज गुरुवारला मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्ग ८ ची विद्यार्थिनी कु. नूतन सिद्धेश्वर सोळंकी होती. प्रमुख मार्गदर्शक म्हणून वर्ग ८ ची विद्यार्थिनी कु. अश्विनी श्रीकृष्ण पवार होती. प्रमुख उपस्थिती म्हणून कु. सिमा सुरडकर या होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. अलका सिद्धेश्वर भवर यांनी तर सूत्रसंचालन वर्ग ६ वी च्या ओम सोळंकी व उदय सोळंकी या विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता, वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या प्रतिमा पूजनाने व दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून, कवितेतून तसेच गीतातून मराठी भाषेबद्दल सन्मान व अभिमान व्यक्त केला. सोबतच या प्रसंगी वर्ग ६ वी, ७ वी व ८ वी च्या विद्यार्थ्यांनी 'मी मराठी व बीज जसे अंकुरते' या शिर्षकावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यामधून मराठी भाषेचा अभिमान दर्शविला व मराठी भाषेची जपवणूक करण्याबद्दल तरुण पिढीला आवाहन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक अश्विनी पवार हिने आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो. राजभाषा दिनाला गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे असा संदेश दिला. याप्रसंगी कु. नूतन सोळंकी हिने विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणातून मराठी ही सर्वांगसुंदर भाषा असून भारतातील अधिकृत २२ भाषांपैकी एक भाषा आहे. या भाषेमुळेच महान राज्य म्हणून महाराष्ट्राला जगात ओळख मिळाली आहे असे सांगून संत ज्ञानेश्वर यांची "माझी मराठीची बोलू कौतुके, परी अमृताहे पैजा जिंके" ही ओवीसुद्धा सांगितली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन वर्ग ६ वी चा रोहन सोळंकी या विद्यार्थ्याने केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मा. प्राचार्य श्री. गणेश नालिंदे सर, प्राध्यापक श्री. गणेश सोळंकी सर, सर्व सहकारी बंधू / भगिनी यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.