logo

बारामतीत चाललंय काय? बॉईज हॉस्टेलमधून 24 मुलं बेपत्ता, तीन जणांचा मृत्यू*तीन खासदार आणि एक उप मूख्यमंत्री असताना सुद्धा प्रशासनाचे दुर्लक्ष...

बारामतीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बारामतीतल्या चर्चेस ऑफ ख्राईस्ट बॉईज होममधून गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता झालेल्या 15 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे बारामती शहर हादरुन गेलंय.
या बॉईज हॉस्टेलचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांच्या जाचाला कंटाळून या अल्पवयीनं मुलानं आत्महत्या केल्याचा आरोप स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलाय. रॉबर्ट गायकवाडला अटक केल्याशिवाय मृतदेहाचे शवविच्छेदन करू देणार नसल्याची स्थानिकांनी भूमिका घेतली आहे.
या प्रकरणी आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. आणि ती म्हणजे 2016 पासून जवळपास 24 मुले या हॉस्टेलमधून बेपत्ता झाले होते. त्या पैकी 16 मुलं सापडली तर तिघांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. तर अद्यापही 5 मुलांचा कोणताच ठिवठिकाणा लागला नाही. दरम्यान या संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी बारामती चर्च ऑफ क्राइस्ट ट्रस्टचे अधीक्षक रॉबर्ट गायकवाड यांच्यावर गंभीर आरोप केलेत. तर गायकवाड यांनी आपण घटनेच्या दिवशी बाहेरगावी गेल्याचं म्हणत जबाबदारी झटकलीय. मात्र घटनेमुळे बारामतीतल्या या बॉईज हॉस्टेलमध्ये नेमकं चाललंय काय असा सवाल उपस्थित होतोय.
तब्बल 24 एफआयआर बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल
2016पासून तब्बल 24 मुलं बेपत्ता झाल्याची माहिती समोर आलीय. अशात तीन दिवसांपासून बेपत्ता मुलाचा शोध सुरू होता. राजवीर शिंदे असं मृत झालेल्या मुलाचे नाव आहे. बारामतीतील चर्च ऑफ ख्राईस्ट बॉइज होममधील मुलगा निरा डावा कालव्यात बुडाला होता. कालव्यात बुडालेल्या मुलाचा 36 तासांपासून शोध सुरू होता. दरम्यान 2016 पासून 24 मुले बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत तब्बल 24 एफआयआर बारामती शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. असे असताना देखील बारामतीतील चर्च ऑफ ख्राईस्ट बॉइज होमच्या जबाबदार व्यक्तींवर कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही.
बॉईज होममध्ये नेमकं चाललंय काय?
बेवारस आणि अनाथ मुलांच्या संगोपनासाठी बारामती मध्ये चर्च ऑफ ख्राईस्ट बॉइज होम उभारण्यात आली आहे. समाज कल्याण विभाग आणि धर्मदाय आयुक्त यांच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या या बॉईज होममध्ये येथील अधीक्षक रॉबर्ट गायकवाड मुलांना त्रास देत असल्याचा आरोप शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या बॉईज होममध्ये शासनाकडून देण्यात येणाऱ्या सुविधा मुलांना दिल्या जात नाहीत. याउलट, मुलांना वैयक्तिक घरची कामे करायला लावली जात आहेत. प्रसंगी मारहाण देखील केली जाते. त्यामुळे अधीक्षकाच्या जाचाला कंटाळून या ठिकाणावरून मुले बेपत्ता होत आहेत. काहीजण कॅनॉलच्या पाण्यात उड्या मारून आपलं जीवन संपवत आहेत. यामुळे या अधीक्षकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी ट्रस्टचे सदस्य जय काळे यांनी केली आहे.
ट्रस्टच्या नियमक मंडळाची तातडीने बैठक
दरम्यान या संदर्भात ट्रस्टच्या नियमक मंडळाची तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे. येत्या दोन दिवसात बैठक घेऊन बेपत्ता मुलांबाबत नेमकं काय झालं या संदर्भातली चर्चा केली जाणार आहे. यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी संस्थेकडून पुढाकार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, संस्थेचे अध्यक्ष दीपक जाधव यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत आपल्याला कोणतीच माहिती दिली जात नसल्याची तक्रार केली आहे. याउलट मुले बेपत्ता झाल्यानंतर देखील अधीक्षकांकडून आपल्याला कळविले जात नसल्याचं सांगत याप्रकरणी अधीक्षक रॉबर्ट गायकवाड हेच जबाबदार असल्याचे अध्यक्षांनी सांगितले आहे.

229
31862 views