
रायपूरात ऐतिहासिक मिरवणूकीने शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न
रायपूरात ऐतिहासिक मिरवणूकीने शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न
दि. 19 फेब्रुवारी
*सादिक शाह*
रायपूर.स्थानिक जय राजे मित्र मंडळ व गावकरी मंडळी रायपूर यांचे वतीने रायपूर येथे मोठ्या उत्साहात ऐतिहासिक अशी शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, शिवजयंतीचा जल्लोष सर्वत्र असतो तसाच तो रायपूर मध्ये बघावयास मिळाला. सर्वप्रथम सकाळी शिवछत्रपतींचा टोप व तलवार यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गावाचे प्रथम नागरिक सुनील देशमाने सरपंच रायपुर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शे. शकील व मो. अकिल पत्रकार यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच हिम्मतराव जाधव माजी सरपंच रायपुर आणि गुरुदेव सेवा भजनी मंडळ यांच्या वतीने राजू देशमाने यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. तसेच सुधाकर कुडके यांच्या हस्ते शहीद धर्मराज हनवते यांच्या स्मारकाचे पूजन करण्यात आले.
सायंकाळी रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार दुर्गेश राजपूत यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या सिंहासनारुढ पुतळ्याचे पूजन करून मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. या मिरवणुकीचे विशेष म्हणजे भला मोठा आम्ही चिखलीकर ढोल पथकांचा ताफा, ऐतिहासिक पारंपरिक वेशभूषा आणि या वेशभूषेत असलेले भारदार मावळे, घोड्यावर विराजमान जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज हे सर्व उपस्थित जनसमुदायाचे लक्ष वेधून घेत होते. सोबतच ट्रॅक्टरवर शिवछत्रपतींची राजमुद्रा व मध्ये भजनी मंडळ व शेवटी सिंहासनावर आरूढ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा. त्याचबरोबर पारंपारिक वेशभूषेत असलेल्या मुली, महीला मावळे, गावातील महीला व पुरुष, युवक तरुण तसेच नागरीक यांच्या सहभागाने मिरवणुकीस मोठी रंगत आणली. मध्येच होणारे तोफ व पेपर ब्लास्ट सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. जय राजे मित्र मंडळाचे कार्यकर्तेही विशेष वेशभूषेत होते. गावातून मिरवणूक काढण्यात आली. यात मुस्लिम युवक व बांधव ही मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे सर्वधर्मीय समाजाचा यात सहभाग होता. मुस्लिम परिसरात मिरवणूक आल्यानंतर जेष्ठ व्यक्ती फारुसेठ सौदागर यांनी शिवछत्रपतींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर मुस्लिम युवकांनीही शिवजयंती मिरवणुकीत शरबत वाटत ऐक्याचं दर्शन घडवले. त्याचबरोबर मनसे कार्यकर्त्यांच्या वतीने हनुमान मंदिर परिसरात शरबत वाटप करण्यात आले. अशा या भव्य दिव्य सोहळ्यासाठी सर्व गावकरी यांनी कौतुक व सहकार्य केले. यामध्ये जिजाऊ च्या भुमिकेत अश्विनी भोसले, शिवाजी महाराज यांच्या भुमीकेत विकी सुनिल सिरसाट तसेच शंभू राजे यांच्या भुमिकेत विकी सिरसाठ होते. तर मावळे म्हणून रवि भोसले, गाढे, अनिकेत जंजाळ, भागवत घोलप, ओम खंडागळे, आदी सिरसाट, सागर भोसले, शुभम करडेल, प्रसाद जोशी, शेखर भोसले, ओम तायडे व विवेक जाधव होते. तिन दिवस चाललेल्या शिवजयंती महोत्सवासाठी जय राजे मित्र मंडळ रायपूर यांनी मेहनत घेतली. तसेच संपूर्ण रायपूर गावाचे सहकार्य लाभले.