
बुलढाणा जिल्ह्यात कालबाह्य व अवैध ऑटोरिक्षांचा सुळसुळाट !
शहरात मोठ्या प्रमाणावर अवैध व कालबाह्य ऑटोरिक्षांचा सुळसुळाट झाला असून यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुणे, मुंबई आणि इतर मोठ्या शहरांमधून अनेक ऑटोरिक्षा वाहने शहरात दाखल झाले असून त्यांच्याकडे कागदपत्रांचा अभाव असल्याचे चित्र उघडउघड आहे. याशिवाय, या ऑटोरिक्षा चालकांकडून अरेरावी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिखली शहरातील अनेक ऑटोरिक्षाचालकांकडे वाहन परवाना, विमा आणि वाहन तपासणी प्रमाणपत्राचा अभाव आहे. विशेषतः कालबाह्य रिक्षा नियमांचे उल्लंघन करून सर्रास रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे या रिक्षांमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून नागरिकांच्या जीवनाशी खेळ खेळला जात असल्याचे चित्र आहे. तसेच अवैध ऑटोरिक्षाचालकांकडून प्रवाशांशी अरेरावीची वागणूक केली जात असल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले आहे. तसेच, वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे प्रवाशांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. काही घटनांमध्ये चालकांकडून अधिकचे भाडे आकारण्याचे प्रकारही घडत आहेत. यामुळे प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत आहे.नागरिकांचा संताप ; तातडीने कारवाईची मागणी
शहरातील नागरिकांनी पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) विभागाने कालबाह्य व विना कागदपत्रे असलेले अवैध रिक्षा त्वरित जप्त करून या प्रकरणात कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून तसेच या रिक्षांच्या कागदपत्रांची सखोल तपासणी केली जावी आणि बेकायदेशीर रिक्षा रस्त्यावरून हटवाव्यात, अशी देखील मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पोलीस आणि आरटीओची भूमिका महत्त्वाची
वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी पोलीस आणि आरटीओ विभागाने तात्काळ कठोर पावले उचलली पाहिजेत. अवैध व कालबाह्य रिक्षा रस्त्यावरून हटवण्यासाठी विशेष मोहिमा हाती घेण्याची गरज आहे. याशिवाय, चालकांवर दंडात्मक कारवाई करून वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळण्यास भाग पाडले पाहिजे.