logo

धानिवरी ब्रिजवरील फोकस लाइट्स बंद; नागरिकांमध्ये संताप, दुरुस्तीची मागणी


धानिवरी ब्रिजवरील फोकस लाइट्स बंद पडल्याने संपूर्ण परिसर अंधारमय झाला असून, नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप दुरुस्तीचे कोणतेही ठोस पाऊल उचललेले नाही.
धानिवरी ब्रिजवर एकूण १४ फोकस लाइट्स बसवलेले आहेत, मात्र गेल्या २-३ महिन्यांपासून त्यापैकी १२ लाइट्स बंद असून, केवळ २ लाइट्स कार्यरत आहेत. परिणामी, संध्याकाळनंतर संपूर्ण परिसर अंधारात बुडून जातो. विशेषतः रात्रीच्या वेळी येथे प्रवास करणाऱ्या महिला, लहान मुले आणि वयोवृद्धांसाठी हा अंधार मोठा धोका बनला आहे.
अंधाराचा फायदा घेत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, परिसरातील किराणा दुकानदार आणि लहान व्यावसायिकांना मोठा फटका बसत आहे. तसेच, वाहनचालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दुर्लक्ष
धानिवरी ब्रिजची देखभाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) अंतर्गत येते. मात्र, नागरिकांच्या वारंवार तक्रारींनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
नागरिकांचा इशारा – लवकरात लवकर दुरुस्ती न झाल्यास आंदोलन
शैलेश कोरडा, सरपंच धानिवरी, यांनी यासंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
"धानिवरी ब्रिजवरील संबंधित अधिकाऱ्याने फोकस लाइट्स त्वरित दुरुस्त करावेत. नागरिकांच्या सुरक्षेशी तडजोड सहन केली जाणार नाही. अन्यथा, आम्हाला आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल."
त्याचप्रमाणे, शैलेश तांबडा, ग्रामस्थ, यांनीही चेतावणी दिली –
"संबंधित विभागाने तातडीने कारवाई करून फोकस लाइट्स सुरू करावेत, अन्यथा नागरिक तीव्र आंदोलन छेडतील."
प्रशासनाने त्वरित पावले उचलण्याची गरज
धानिवरी ब्रिजवरील फोकस लाइट्स सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालून दुरुस्ती करावी, अन्यथा मोठ्या आंदोलनाची चेतावणी देण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर उपाययोजना करणे गरजेचे आहे.

0
208 views