logo

शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणानंतर हत्येचा उलगडा


डहाणू तालुक्यातील तलासरी येथील वेवजी गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी यांच्या अपहरणानंतर हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. २० जानेवारी रोजी मुंबईहून परतताना बेपत्ता झालेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह ३१ जानेवारी रोजी गुजरातमधील सरिगाम येथील एका बंद दगड खदाणीत त्यांच्या वाहनासह आढळून आला. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
अपहरणानंतर १२ दिवसांनी सापडला मृतदेह
अशोक धोडी २० जानेवारी रोजी मुंबईला कामानिमित्त गेले होते. त्यांनी रात्री घरी फोन करून जेवणासाठी येत असल्याची माहिती दिली होती. मात्र, घोलवडहून घरी परतताना त्यांचे वाहनासह अपहरण करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांनी घोलवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र, १२ दिवसांनंतरही त्यांचा तपास लागत नव्हता.
कुटुंबीयांनी संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. तपासादरम्यान, पोलिसांनी अशोक धोडी यांचे भाऊ अविनाश धोडी, मनोज राजपूत (सरीगाम – गुजरात) आणि सुनील धोडी (जामशेत – डहाणू) यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यातून फरार झाल्याने या हत्येचा संबंध पूर्ववैमनस्यातून असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण डहाणू आणि तलासरी तालुक्यात खळबळ माजली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

296
16222 views