
ट्रकच्या धडकेत गणपत सुर्वे यांचा जागीच मृत्यू: आंबेदा गावात शोककळा, ट्रक मालकावर कारवाईची मागणी
बोईसर: आंबेदा येथील गणपत सुर्वे हे रोजगारासाठी रोज मोटारसायकलवरून बोईसर येथील कंपनीत कामावर जात असत. आज सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास, बोईसर रस्त्यावर गणपत सुर्वे यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत गणपत सुर्वे थेट ट्रकच्या चाकाखाली गेले. दुर्दैवाने, ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या दुर्दैवी घटनेमुळे आंबेदा गावात शोककळा पसरली असून, त्यांच्या अकाली मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गणपत सुर्वे यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, सदर ट्रक व चालकाला लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि ट्रक मालकावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच, कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी योग्य ती मदत देण्यात यावी, अशीही विनंती त्यांनी केली आहे.
गावकऱ्यांनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, ट्रक मालक व चालक यांच्यावर कठोर पावले उचलण्यात यावीत, अशी मागणी केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या घटनेची तत्काळ दखल घेऊन न्याय मिळवून द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.