स्वयंशिस्तीने अपघात टाळता येतील - सुरेंद्र निकम
- इंदापूर महाविद्यालयात रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रॅली व रक्तदानाचे आयोजन
- सहभागी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त रस्ता सुरक्षेच्या घोषणा देऊन इंदापूर शहरवासीयांचे रॅलीच्या माध्यमातून लक्ष वेधून घेतले.
कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व विद्यार्थी कल्याण मंडळ, राष्ट्रीय छात्र सेना आणि विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय इंदापूर व बारामती आर.टी.ओ. विभाग आणि इंदापूर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष व राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम व शहरात भव्य रॅली आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले.
600 विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिरात अनेक विध्यार्थी यांनी रक्तदान केले.
बारामती उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी सुरेंद्र निकम विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की,' रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमाचे ब्रीदवाक्य ' परवाह' हे आहे. परवाह म्हणजे काळजी घेणे. रस्त्यावर वाहन चालवत असताना स्वतःची आणि इतरांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वयंशिस्तीने अपघात टाळता येतील.'
इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे म्हणाले की,' घराबाहेर पडल्यानंतर प्रत्येकाचा संबंध रस्त्याशी येतो . रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत आपणास सांगू इच्छितो की केवळ पोलीस प्रशासन व आरटीओ विभाग यांनी हे अभियान राबवून उपयोगाचे होणार नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभागी होऊन आपल्या घरातील व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत रस्ता सुरक्षा संदर्भातील नियमांचे पालन करण्यासंदर्भात जागृती होणे आवश्यक आहे.
मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की ,'युवकांनी रस्ता सुरक्षा संबंधी नियम पाळावेत. रस्ता अपघातामध्ये तरुणाचे प्रमाण जास्त आहे. गाडीची कागदपत्रे, विमा संबंधी जागरूक राहिले पाहिजेत.
अध्यक्षीय भाषणात इंदापूर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन सरवदे म्हणाले की,' आपल्या शरीरात रक्तवाहिन्या जे काम करतात तेच काम देशातील रस्ते करीत असतात. वाहनांचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचे कार्य आरटीओ विभाग करीत असतो तर गाडी चालवणाऱ्यांचे आरोग्य तंदुरुस्त ठेवण्याचे कार्य पोलीस प्रशासन करीत असते.
विद्या प्रतिष्ठान कॉलेजचे प्राचार्य डॉ.एस. आर. देशपांडे म्हणाले की,' रस्ता सुरक्षा संबंधी रस्त्यावर चालणाऱ्या प्रत्येकाने इतरांचा आदर करावा. जसे की मोटार सायकल चालवणाऱ्यांनी सायकल चालवणाऱ्यांचा आणि मोटार चालवणाऱ्यांनी मोटरसायकलवाल्यांचा आदर करावा. आमचे महाविद्यालय पोलिस आणि आरटीओ विभागाला कायम सकारात्मक प्रतिसाद देते.
इंदापूर महाविद्यालयाचे प्रा. नामदेव पवार यांनी युवाशक्ती मोठी शक्ती आहे. या शक्तीने सकारात्मक पद्धतीने विचार करून रस्ता सुरक्षा संबंधीच्या नियमांचे तंतोतंत पालन करावे असे मत मांडले.
इंदापूर पोलिस स्टेशनचे पी एस आय श्री पवार, सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रोहित भोसले , सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक तेजस मखरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर राऊत , विज्ञान विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर ,राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रशांत साठे तसेच राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी प्रा. दिनेश जगताप कनिष्ठ विभाग राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सुवर्णा जाधव , प्रा.धनंजय माने, पॅथॉलॉजी विभागाच्या शितल शिंदे यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी कल्याण मंडळाचे अधिकारी डॉ.तानाजी कसबे यांनी केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.उत्तम माने यांनी आभार मानले.