logo

साहित्यिक शंकरराव कुरुडे यांचे व्यक्तिमत्व सर्वांना प्रेरणादायी - डॉ.सायन्ना मठमवार यांचे प्रतिपादन


नांदेड, दि.18 : भावसार चौक चक्रधर स्वामी नगर येथील अनिलराव ढगे यांच्या निवासस्थानी शंकरराव कुरुडे काका यांच्या 'कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सायन्ना मठमवार यांच्या शुभहस्ते नुकतेच करण्यात आले.

या प्रकाशन समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त कृषी अधीक्षक सर्वश्री एस.आर. तपासे, प्रा. सुरेश कंकाळ, आर.के. बाचेवाड चिखलीकर, बालाजीराव एमेकर यांची उपस्थिती होती.

प्रारंभी पाहुण्यांचा सत्कार अनिल ढगे यांच्या वतीने गुलाबाचे रोपटे भेट देऊन करण्यात आले. प्रकाशन समारंभ प्रसंगी गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक तथा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त सेवानिवृत्त मुख्याध्यापक डॉ. सायन्ना मठमवार असे म्हणाले, "लेखक श्री शंकरराव कुरडे सर यांचे व्यक्तिमत्व सर्वांग सुंदर असून सर्वांना प्रेरणादायी आहे. विशेष म्हणजे त्यांची लेखन शैली अत्यंत उत्तम असून स्वलिखित 'कर्मयोगी पंतप्रधान नरेंद्र मोदी' या पुस्तकात माननीय पंतप्रधानांच्या कार्याविषयी भावना आणि कृतज्ञता विचारातून व्यक्त केली आहे. देशाच्या पंतप्रधानाचे कार्य राष्ट्रहितासाठी मोलाचे आहे. हे त्यांच्या मांडणीतून लक्षात येते. नरेंद्र मोदी यांच्या रूपाने देशाला एक सक्षम, कार्यक्षम, कुशल व प्रभावी नेतृत्व मिळाले आहे. याबाबत सविस्तर वर्णन या नवप्रकाशित पुस्तकात नमूद आहे. तसेच त्यांच्या पुस्तकाचा लाभ सर्वांनी घ्यावा."

नवप्रकाशित पुस्तकाचे लेखक कुरुडे सर सत्काराला उत्तर देताना असे म्हणाले, "ईश्वर कृपेने माझी प्रकृती उत्तम आहे. मला वाचनाचा, लेखनाचा व्यासंग आहे. यापुढेही लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य चालू ठेवीन. देशाचे भाग्यविधाते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा तरुणांनी आदर्श घ्यावा."

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. रेणुका ढगे यांनी केले तर आभार अनिल मनोहर ढगे यांनी मानले. याप्रसंगी चिंतेश्वर कुरुडे, वरद कुरुडे आदींची उपस्थिती होती. लेखक श्री शंकरराव कुरुडे सर यांनी 90 व्या वर्षी या पुस्तकाचे लिखाण केले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे.

1
22 views