logo

जय बजरंग बली क्रिकेट स्पर्धेत आराध्या ईलेवनचे विजेतेपद कायम


बऱ्हाणपूर पाटीलपाडा येथे जय बजरंग बली मंडळाच्या वतीने सलग दुसऱ्यांदा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यंदा स्पर्धेत पाटीलपाडा येथील जवळपास पन्नास तरुणांनी सहभाग घेत आपल्या क्रिकेट कौशल्यांचे प्रदर्शन केले.
चार संघांनी घेतला सहभाग
स्पर्धेत आराध्या ईलेवन (भरत पुंजारा), आर.सी.बी फायटर (मिलिंद पुंजारा), विष्णू फायटर (विष्णू तुंबडा), आणि अजित फायटर (अजित रजपूत) या चार संघांनी लिलाव पद्धतीने खेळाडू निवडून सहभाग घेतला.
उद्घाटन सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती
स्पर्धेचे उद्घाटन बऱ्हाणपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रशांत तांबडा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी मंडळाला आर्थिक मदत केली तसेच सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. यावेळी आशाताई सुनिता रजपूत, ग्रामपंचायत सदस्य प्रियंका पुंजारा, विजय पुंजारा, नरेश पुंजारा, बच्चु , परशुराम, विनोद, रघुनाथ आणि अन्य मान्यवरांनीही उपस्थित राहून सहकार्य केले.
रोमहर्षक सामने आणि अंतिम विजेता
स्पर्धेतील सलामीचा सामना आराध्या ईलेवनने जिंकून विजयी सुरुवात केली. अंतिम सामन्यात आराध्या ईलेवन आणि अजित फायटर यांच्यात चुरशीचा सामना झाला. नाणेफेक जिंकून आराध्या ईलेवनने फलंदाजी करत ५ षटकांत ३४ धावा केल्या. अजित फायटरचा संघ २४ धावांवरच आटोपला, त्यामुळे आराध्या ईलेवनने सलग दुसऱ्यांदा चषक जिंकला.
सन्मान आणि गौरव
स्पर्धेत सहभागी सर्व संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. आयोजक मंडळाच्या अथक प्रयत्नांमुळे स्पर्धा यशस्वीपणे पार पडली.

6
3386 views