logo

अखिल भारतीय आदिवासी हलबा/ हलबी समाजाचे रविवारी (12 जानेवारीला) भव्य मेळाव्याचे आयोजन

अमरावती, दि. ९ : अखिल भारतीय आदिवासी हलबा/हलबी समाजाचे भव्य आदिवासी जनजागृती मेळाव्याचे आयोजन गडचिरोली/चिमूरचे खासदार डॉ. नामदेवराव किरसान यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार, दि. 12 जानेवारी 2025 रोजी सौ. सावित्रीबाई यादव सभागृह, संताबाई यादव नगर, चांदूर रेल्वे येथे सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे. या मेळाव्याचे आयोजन आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना विभागीय शाखा अमरावतीच्या वतीने करण्यात आले असून सर्व समाजबांधवांनी या मेळाव्याला उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे अध्यक्ष हेमराज राऊत व सदस्यांनी केले आहे.
या जनजागृती मेळाव्यात विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सर्व अकरा जिल्ह्यातील समाजबांधव यांच्यासह मध्यप्रदेश व छत्तीसगड येथील आदिवासी समाज बांधव एकत्रपणे उपस्थित राहणार आहे.
या मेळाव्याला आदिवासी हलबा/हलबी कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष यादवराव भोयर अध्यक्ष म्हणून तर माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहे. आदिवासी विकास विभागाच्या उपायुक्त श्रीमती जागृती कुमरे, नागपूर महासंघाचे कार्याध्यक्ष माधवराव गावड, छत्तीसगड संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राधेश्यामजी नाईक, आदिवासी एकता परिषद, नवी दिल्लीचे बी. एस. रावटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या मेळाव्याला तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्यांकडून महत्वाच्या विषयांवर मार्गदर्शन करण्या येणार आहे. त्यात डॉ. मनिष वाडीवे हे स्पर्धा परीक्षांविषयी मार्गदर्शन करणार आहे. प्रा. अनिता धुर्वे यांच्याव्दारे नवीन शिक्षण पध्दती आणि विद्यार्थ्यांच्या अडचणी याविषयी, महेन्द्र कोठेवार व अजय कोठेवार यांच्याव्दारे अंधश्रध्दा व समाज एकत्रिकरण या विषयासंबंधी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचे उद्घाटन व दिप प्रज्वलन, सकाळी 11 ते 3 वाजेपर्यत प्रमुख अतिथींचे स्वागत व मार्गदर्शनपर भाषणे, दुपारी 3 ते 4 या वेळेत भोजन व त्यानंतर 4 ते सायं. 6.00 गुणवंत विद्यार्थी विद्यार्थींनींचा सत्कार व सांस्कृतिक कार्यक्रमाने समारोप याप्रमाणे कार्यक्रमावली राहणार आहे.
आदिवासी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी समाजाची आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व औद्योगिक प्रगती होणे आवश्यक आहे आणि ती काळाची गरज सुध्दा आहे. या महत्वपूर्ण घटकांबाबत समाजातील लोकांमध्ये व्यापक प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. या संदर्भात मेळाव्यात तज्ज्ञ व समाजिक कार्यकर्ते मार्गदर्शन करणार आहेत. सद्यस्थितीत गैरआदिवासी लोकांनी खोट्या अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्रांच्या आधारे खऱ्या आदिवासी समाजाचे शासकीय योजनांचे लाभ घेतले असून शासकीय नोकऱ्या सुध्दा बळकावल्या आहेत. यामुळे अनेक आदिवासी शेतकरी, शेतमजूर गोरगरीब लोक शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित आहेत. खरा आदिवासी समाजबांधव विकासाच्या प्रवाहापासून कोसो दूर जात आह.
खऱ्या आदिवासी गोरगरीब जनतेचा सर्वांगिण विकास साधायचा असेल तर आदिवासी समाजाला एकजूट होऊन आपली ताकद दाखवावी लागेल. तसेच आदिवासींना मिळत असलेल्या विविध शासकीय योजना, उपक्रम, शासनाचे धोरण, शैक्षणिक लाभ आदी संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून चांदूर रेल्वे येथील सौ. सावित्रीबाई यादव सभागृह, संताबाई यादव नगर याठिकाणी भव्य आदिवासी हलबा/हलबी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यास समाजातील सर्व बंधू भगिनींनी बहुसंख्येने आर्वजून उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजकांनी केले आहे.

1
22 views