logo

कडाक्याच्या थंडीत वनमजुरांचे आंदोलन

शेकडो मजूर आंदोलनात सहभागी

नांदेड, दि. ७ ः वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागातील कायम रोजंदारीवरील सेवाज्येष्ठ मजुरांना सेवेत सामावून घ्यावे या व इतर मागण्यांसाठी शासकीय औद्योगीक कामगार संघटनेच्यावतीने सामाजिक वनीकरण व वनविभागाच्या कार्यालयासमोर बेमुद्दत आंदोलन आज सुरु करण्यात आले.

सामाजिक वनीकरण व वन विभागात वर्षानुवर्ष कायम रोजंदारी मजूर म्हणून अनेक महिला, पुरुष कामगार वर्षानुवर्ष काम करीत आहेत. राज्य शासन व वन विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून सेवा ज्येष्ठता यादीची मागणी करुनही स्थानिक पातळीवरील अधिकारी व कर्मचारी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत आहेत. स्थानिक पातळीवरील वरिष्ठ पातळीवर वनमजूरांना कायम करण्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावेत, किमान वेतनाच्या फरकाची रक्कम अदा करावी, वनविभागातील मुखेड रेंज अंतर्गत थकलेला मार्च 2024 महिन्याचे वेतन अदा करावे, माहे सप्टेंबर 2024 पासूनचे थकीत वेतन तात्काळ अदा करावे, रोजगार हमी वरील कामगारांचे मस्टर संलग भरावे यासह इतर मागण्यांसाठी नायगाव, बिलोली, मुखेड, धर्माबाद, हदगाव, किनवट आदी तालुक्यातील शेकडो स्त्री-पुरुष कामगार आजच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

यावेळी बोलतांना कामगार नेते ऍड.कॉ.प्रदीप नागापूरकर म्हणाले की, अधिकारी व कर्मचार्‍यांनी कायम रोजंदारीवरील कामगारांना सहानुभूतीची वागणूक द्यावी हे कामगार टिकले तरच तुमच्या नौकर्‍या टिकणार आहेत. त्यामुळे तातडीने कामगारांच्या मागण्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. या आंदोलनाचे नेतृत्व शासकीय औद्योगीक कामगार संघटनेचे नेते कॉ.अब्दुल गफार, कॉ.शिवाजी फुलवळे हे करीत आहेत. तर या आंदोलनात कॉ.पिराजी घाटे, कॉ.सुशिला आरोटे, कॉ.रामजी सोनकांबळे, कॉ.मारोती गायकवाड, कॉ.बालाजी जाधव, कॉ.गोशाबी शेख, कॉ.गंगारा सूर्यवंशी, कॉ.पंचशिला कांबळे, कॉ.ललीता चव्हाण यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले आहेत.

0
0 views